ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या प्रमिला केणी यांनी स्वतंत्र अपक्ष गटाची नोंदणी करत शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. प्रेमिला केणी या ठाणे महापालिकेत एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने सभागृहातील शिवसेनेचे संख्याबळ आता एक एकने वाढले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने गुरुवारी 75 नगरसेवकांच्या गटाची कोकण भवन येथे नोंदणी केली असून नगरसेवक पचन कदम यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रमिला केणी यांना यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने त्यांच्या अधिकृत उमेदवाराची उमेदवारी मागे घेत, केणी यांना पुरस्कृत जाहीर केले होते. या लढतीत प्रमिला केणी यांनी शिवसेनेच्याच अधिकृत उमेदवार मनाली पाटील यांचा पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी प्रमिला केणी देखील उपस्थित होत्या.
दरम्यान, गुरुवारी त्यांनी स्वतंत्र गटाची नोंदणी करत शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रमिला केणी यांचे पुत्र मंदार केणी हे देखील या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना प्रमिला केणी म्हणाल्या की, राजकारणापेक्षा मी प्रभागाचा विकास नेहमीच केंद्रबिंदू मानला आहे. जनतेने त्यांना स्पष्ट कौल दिला असून, ठाण्याच्या सर्वांगीण विकासासोबत प्रभागाचाही विकास व्हावा, हीच भूमिका असल्याचे प्रमिला केणी यांनी सांगितले.
दरम्यान शिवसेनेनी आपल्या 75 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी कोकण भवन या ठिकाणी केली असून शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर बसणार असून त्या दृष्टीने शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.