ठाणे : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात राज्यातील २८ महापालिकांमध्ये ठाणे महापालिकेचा चौथा क्रमांक आला आहे. तर राज्यात २२ वा क्रमांक आला आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला असून पालिका गटात मालेगाव महापालिकेने पहिला क्रमांक, धुळे दुसरा आणि कोल्हापूर महापालिकेने सहा क्रमांक पटकावला आहे.
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात क्षयरोग निर्मूलनासाठी करण्यात आलेले उपचार, रुग्णांची काळजी, औषधोपचारासाठी पाठपुरावा तसेच क्षयरोगाविषयी जनजागृती, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना केलेले सहाय्य या मुद्द्यांच्या आधारे गुणांकन करण्यात आले. त्यात, ठाणे महापालिकेस राज्यातील महापालिका गटात चौथा क्रमांक मिळाला.दुसरीकडे ठाणे जिल्हाला क्षयरोग निर्मूलनामध्ये ८३. ८३ गुण मिळाल्याने राज्यात २२ वा क्रमांक आला आहे. तर ठाणे ग्रामीण गटात १४ क्रमांक आलेला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका २२, नवी मुंबई १४, भिवंडी ४, मीरा भाईंदर ८ आणि उल्हासनगर महापालिकेचा २१ वा क्रमांक आला आहे.
सन २०२४ मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात ८१४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, ६९३६ रुग्णांनी निक्षय पोषण योजनेचा लाभ घेतला. एकूण ५७७२ रुग्णांचे क्षयरोगाचे उपचार पूर्ण झाले असून उर्वरित रुग्णांची उपचार प्रक्रिया सुरू आहे. क्षयरोग मोहिमेअंतर्गत ५ लाख ७७ हजार १९० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. ठाणे मध्यवर्ती कारागृह, मनोरुग्णालय, बांधकाम साईट, मॉल आदी ठिकाणी एक्सरे मशीन द्वारे कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच महापालिका क्षेत्रात घरोघरी तपासणी मोहिम राबवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.