ठाणे : ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील आठ उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विभागीय पदोन्नती निवड समितीने आठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची शिफारस केली असून, प्रशासनाने त्यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र, या आठपैकी पाच अधिकाऱ्यांच्याच पदोन्नतीचे आदेश तातडीने काढणे शक्य होणार असून, उर्वरित तिघांना निर्धारित कालावधी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापालिकेच्या उपअभियंता (नागरी) या वर्ग दोनच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना वर्ग एकमधील कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याबाबत ५ नोव्हेंबर रोजी विभागीय पदोन्नती निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव तसेच गोपनीय अहवाल तपासण्यात आले.
या निकषांच्या आधारे शैलेंद्र रामदास चारी, अतुल भोळे, माधव लक्ष्मण जागडे, अनिल पुंडलिक पाटील, किशोर गोळे, उमेश भोसले, ऋषिकेश जवळकर आणि राजेंद्र आर. कुसूरकर यांच्या पदोन्नतीची शिफारस करण्यात आली.
या शिफारशीनुसार उमेश भोसले यांना ३० नोव्हेंबरनंतर, ऋषिकेश जवळकर यांना २८ फेब्रुवारी २०२७ नंतर, तर राजेंद्र कुसूरकर यांना ३१ मे २०२७ नंतर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या तिघांना कार्यकारी अभियंता पदावर रुजू होण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. उर्वरित पाच अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर जारी करता येणार आहेत.
या पदोन्नती प्रक्रियेत शैलेंद्र चारी यांचे प्रकरण विशेष चर्चेत राहिले. मे २०२५ मध्ये त्यांना एक वर्षासाठी वेतनश्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबाबतचा निर्णय बंद पाकिटात ठेवण्यात आला होता. शिक्षेचा कालावधी २६ मे रोजी संपुष्टात आल्यानंतर ५ नोव्हेंबरच्या पदोन्नती समितीच्या बैठकीत हे बंद पाकीट उघडण्यात आले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेचा विचार करून त्यांच्या पदोन्नतीची शिफारस करण्यात आली.