ठाणे : अनधिकृत बांधकामप्रकरणी अडचणीत आलेले ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचप्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागाने अटक केली. बुधवारी संध्याकाळी ठाणे महापालिका मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात एसीबीने धाड टाकत ही कारवाई केली. घोडबंदर मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळे यांनी विकासकाकडून 25 लाखांची मागणी केली होती. त्यातील 15 लाखांची रक्कम स्वीकारताना पाटोळेंना रंगेहात पकडले आहे.
न्यायालयाने अनधिकृत बांधकामप्रकरणी दणका दिल्यानंतर बेकायदा बांधकामांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने सध्या कारवाई करण्यात येत आहे.अभिराज डेव्हलपर्सचे अभिजीत कदम यांच्याकडून घोडबंदर रोड येथे सुरू असलेल्या बांधकामाजवळील अतिक्रमण हटविण्यासाठी पाटोळे यांनी 25 लाखांची मागणी केली होती. यामध्ये 10 लाख अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा करूनही काम न केल्याने अभिजीत कदम यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती.
बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ठाणे महापालिका मुख्यालयात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेच्या तळमजल्यावरील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पाटोळे यांच्या कार्यालयात छापा टाकला. यावेळी संबंधित विकासकाकडून 15 लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. सुमारे 1 ते दीड तास चौकशी केल्यानंतर पाटोळे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच एका माजी अधिकार्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. यामध्ये या माजी अधिकार्याने पाटोळे यांच्यासह सेवेत असलेल्या अधिकारी आणि माजी नगरसेवकांची नावे देखील घेतली होती. त्यामुळे यामध्ये ठाणे पालिकेचे इतर अधिकारी देखील चौकशीच्या फेर्यात अडकण्याची चिन्हे आहेत.