ठाणे महापालिकेत पुन्हा 131 नगरसेवकच बसणार pudhari photo
ठाणे

Thane corporation wards : ठाणे महापालिकेत पुन्हा 131 नगरसेवकच बसणार

प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नगरविकास खात्याकडे सुपूर्द

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून हा प्रारूप आराखडा मंगळवारी नगर विकास खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. वॉर्डची संख्या वाढण्याबरोबरच नगरसेवकांची संख्या काही प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली असून ठाणे महापालिकेत पुन्हा 131 नगरसेवकच बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर वॉर्डची संख्याही 33 इतकीच ठेवण्यात आली असून 32 वॉर्डमध्ये चारचे पॅनल तर एका वॉर्डमध्ये तीनचे पॅनल असेल, अशी माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे.

प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह इच्छूक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. असे असले तरी, मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील पालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्राथमिक कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेवरून प्रभागांचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले होते. ही प्रभाग रचना तयार करताना जनगणनेनेची प्राप्त माहिती, प्रत्यक्ष स्थळाची पाहणी, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे, प्रभागाच्या हद्दी जागेवर जाऊन तपासणे या प्रक्रिया करण्यात आल्या .

2017 मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग रचना होती त्याच पद्धतीने नव्याने नवा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या निवडणुकीतही चार सदस्यांंचे 32 आणि तीन सदस्यांचा एक असे 33 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख येथून तर शेवटचा प्रभाग हा दिव्यातील तीन पॅनलाचा करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 2017 प्रमाणेच 131 नगरसेवकच पुन्हा सभागृहात बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • 21 ऑगस्ट - प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता

  • 2 ते 8 सप्टेंबर - प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती

  • 9 ते 15 सप्टेंबर - पुन्हा नगर विकास खात्याकडून निवडणूक आयोगाला आराखडा सादर होणार

  • 16 ते 17 सप्टेंबर - अंतिम आराखडा नगरविकास खाते निवडणूक आयोगाला पाठवणार

  • 3 ते 6 ऑक्टोबर - अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT