राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिकच बनतेय रोजगाराचा आधार pudhari photo
ठाणे

Thane News : राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिकच बनतेय रोजगाराचा आधार

ठाणे-मुंब्रा-कळवा महामार्गावर पोट भरणाऱ्यांची चित्तथरारक कहाणी

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

ठाणे, मुंब्रा व कळवा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग आज केवळ वाहनांची वाहतूक करणारा रस्ता हा केवळ वाहतुकीसाठीचा रस्ता उरलेला नाही, तर अनेक कुटुंबांच्या रोजंदारीचा मार्ग बनला आहे. इथे दररोज ट्रॅफिकच्या कोंडीत अडकलेल्या वाहनांइतकीच एक वेगळी गर्दी येथे दिसते, ती म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुण व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची.

उकडलेल्या शेंगा, भाजलेले चणे, शेंगदाणे यांचे शंकाकृती पुडे, तळलेले पोंगे, कुरकुरीत व चटपटीत फरसाण, तसेच मीठ-मसाल्याने माखलेली काकडी व पेरू, हे सारे पदार्थ हातात घेऊन हे विक्रेते मोठमोठ्या वाहनांच्या चालत्या गर्दीतून वाट काढत फिरताना दिसतात. १० ते २० रुपयांत मिळणारे हे पदार्थ प्रमाणात कमी असले, तरी प्रवाशांच्या प्रवासापुरत्या भुकेवर मलम लावतात. ठाणे महामार्गाच्या हद्दीतील कळवा-मुंब्राकडे वळण घेणाऱ्या रस्त्यावरचे दृश्य विशेष लक्षवेधी आहे.

पूर्वी येथे टोल नाका होता. नाशिक दिशेने खाडीवरील अरुंद पूल, सततची वाहतूक कोंडी आणि संथ गती, यामुळे कळवा-मुंब्रा फाट्यावर वाहतुकीचा कायमस्वरूपी खोळंबा असतो. हाच खोळंबा या विक्रेत्यांसाठी रोजंदारीचा आधार ठरला आहे.

संघर्ष जीवघेणा

हा आधार म्हणजे कोणतेही संरक्षण नाही, कोणतीही सुरक्षितता नाही. एका क्षणाच्या चुकलेल्या अंदाजाने अपघात होण्याची, जीवावर बेतण्याची संभावना नित्याचीच. तरीही पोटाची आग, कुटुंबाची जबाबदारी आणि जगण्याची आस त्यांना रोज पुन्हा त्या महामार्गावर खेचून आणते. हा केवळ रोजगार नाही, तर जीवघेणा संघर्ष म्हणावा लागेल.

महामार्गावर रोजगार...

ट्रॅफिकमध्ये अडकलेले अनेक प्रवासी हे जलद खाद्य आनंदाने खरेदी करताना दिसतात. त्यांच्या भुकेला ऐन ट्रॅफिकमध्ये जणू व्यासपीठ मिळते, तर विक्रेत्यांना त्या क्षणापुरता रोजगार. मात्र, प्रश्न असा आहे की, माणसाला जगण्यासाठी महामार्गावर जीव धोक्यात घालावा लागतो, ही कोणत्या व्यवस्थेची शोकांतिका आहे? महानगरपालिका, वाहतूक पोलीस, प्रशासन या साऱ्यांसमोर हा प्रश्न उभा आहे. रोजगाराच्या संधी नसल्याने ट्रॅफिकमध्ये उतरलेले हे हात, उद्या एखाद्या अपघाताचे बळी ठरले तर जबाबदारी कोणाची?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT