डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशन जवळच्या मोहने येथील महात्मा फुले नगरात २५ फेब्रुवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी गॅस सिलेंडर गळती स्फोटात गंभीर जखमी व्यक्तीचा शुक्रवारी (दि.७) मृत्यू झाला. विजय तांडेल असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर मुंबईतील सायनच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रशासन आणि संबंधित गॅस एजन्सीने कोणतीही ठोस मदत न दिल्याने तांडेल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यांचा जीव वाचवता आला असता. परंतु वेळीच आर्थिक मदत न झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मोहने येथील महात्मा फुलेनगरमध्ये २५ फेब्रुवारी रोजी सकाळी एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली होती. यात घराचे मोठे नुकसान होऊन तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला विजय तांडेल यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात हलवण्यात आले. अखेर शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतरही तांडेल यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. स्थानिकांनी वारंवार गॅस एजन्सीसह प्रशासनाकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र कुठूनही योग्य ती मदत न मिळाल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कुटुंबालाच उचलावा लागला. विजय तांडेल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने आक्रोश व्यक्त करत गॅस एजन्सी आणि प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
या दुर्घटनेने संपूर्ण मोहने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तांडेल यांच्या निधनानंतर स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून गॅस एजन्सीवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. जर वेळेत योग्य ती मदत मिळाली असती तर विजयला वाचवता आले असते, अशी प्रतिक्रिया आकाश कांबळे या स्थानिक रहिवाशाने दिली. आता तरी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.