ठाणे : कारागृहातील बंदी, त्यांचे कुटुंबीय आणि वकीलांना त्यांच्याशी संवाद साधनाचा मार्ग सुलभ व्हावा यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात मोबाईल लिगल एड क्लिनिकची सुविधा सुरू करण्यात आली.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे व “दर्द से हम दर्द तक” सामाजिक संस्था आणि मध्यवर्ती कारागृह ठाणे यांचे संयुक्त विद्यमानाने कारागृहातील बंदिस्त न्यायालयीन बंदयांना ई-मुलाखतासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली. ऑनलाईन मुलाखात प्रक्रिया समजावून सांगणे, त्यासाठी बंद्यांच्या नातेवाईकांना सहाय्य करणे तसेच या नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे यासाठी “दर्द से हमदर्द तक” या संस्थेच्या मदतीने कारागृह परिसरात मोबाईल लिगल एड क्लिनीकचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.के. फोकमारे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तुरुंग अधिक्षक राणी भोसले, संस्थेचे संचालक अॅड. प्रकाश साळसिंगीकर उपस्थितीत होते.
प्रत्येक कैद्याला घरातील सदस्य, नातेवाईक तसेच विधिज्ञ यांना संवाद साधण्याचा मुलभूत अधिकार आहे. परंतू भारतातील सर्व कारागृहात त्यातील क्षमतेपेक्षा जास्त कैदी संख्याने तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे पारंपारीक पध्दतीने चालत आलेल्या मुलाखत प्रक्रियेचा विचार केला असता सर्वच कैद्यांना मुलाखतीसाठी दिरंगाईचा सामना करावा लागतो.
परंतु, तंत्रज्ञानामध्ये झालेला अमुलाग्र बदल व त्यानुसार बदल असलेली न्यायप्रणाली व तुरुंग प्रशासनाची कार्यपध्दती मुळे ई-मुलाखत म्हणजेच ऑन लाईन पध्दतीने मुलाखतचा मार्ग मोकळा झालेला आहे. परंतू, न्यायालयीन बंदी व त्यांचे कुटुंबीय याचा विचार केला असता या प्रणालीची माहीती व ज्ञान नसल्याने त्याचा प्रसार व प्रचाराची आवष्यकता आहे.
याच बाबीचा विचार करुन कैद्यांना व कैद्यांच्या नातेवाईकांना ई-मुलाखतचा लाभ घेता यावा या उद्देशाने मोबाईल लिगल एड क्लिनीक सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या क्लिीनक मध्ये सामाजिक संस्थेचे विधीज्ञ आठवडयातून दोन दिवस सकाळी 09ः30 ते 12ः30 या वेळेत विनामुल्य सेवेसाठी उपलब्ध असतील अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली.