डोंबिवली (ठाणे) : गेल्या सात वर्षांपासून कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा पुलाचे काम रखडले आहे. रखडलेल्या पुलामुळे प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (दि.31) रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील पलावा पुलाच्या ठिकाणी एकत्र आल्याचे दिसून आले.
पलावा पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी शेकडोच्या संख्येने जमा झाले होते. कल्याण ग्रामीणचे शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी ३१ मेपर्यंत पलावा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने, तसेच गेल्या सात वर्षांपासून पलावा पुलासंदर्भात प्रवाशांना फक्त आश्वासनांची गाजरे दाखविण्याची कामे या भागातील लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याने त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मनसेचे नेते तथा या भागाचे माजी आमदार राजू पाटील आणि जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे एकत्र आले होते.
जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पलावा पूल उद्घाटनाची एक उपरोधिक निमंत्रक पत्रिका तयार केली होती. ‘पलावा पुलाचे आश्वासन कधीच संपले नाही आणि पलावा पूल कधीच पूर्ण झाला नाही,’ अशी टोलेबाजी या पुलाच्या मार्गात अडथळे ठरणाऱ्या लोकप्रतिनिधींवर करण्यात आली होती. हा सगळा रोख शिंदे शिवसेनेतील विकासपुरूष लोकप्रतिनिधींच्या दिशेने होता. त्यामुळे पलावा पुलासाठी केलेल्या निषेध आंदोलनात सहभागी होण्याचा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम माजी आमदार राजू पाटील यांनी जाहीर केला नव्हता. तरीही रखडलेल्या पुलाच्या कामासाठी ठाकरे पक्ष आंदोलन करत असल्याने त्यांना समर्थन देण्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे या भागात विकासाच्या नावाने मिरविणाऱ्या शिंदे शिवसेनेतील लोकप्रतिनिधींना डिवचण्याकरिता माजी आमदार राजू पाटील यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
पलावा चौकातील पुलाला अडथळा निर्माण करणारी दुकाने हटविण्यास काही राजकीय नेत्यांचा विरोध आहे. या कचाट्यात पलावा पूल गेल्या सात वर्षांपासून रखडला आहे. या रखडलेल्या पुलाचा प्रवाशांना कोंडीच्या माध्यमातून त्रास होत आहे. पूल सुरू होणार या नावाने फक्त लोकांना चाॅकलेट व गाजरांची आश्वासने दिली जातात, अशी उपरोधिक टीका दीपेश म्हात्रे यांनी केली.
सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आम्ही सदैव एकत्र आहोत. ही लढाई, आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरूध्द नाही. शिळफाटा रस्त्यावर सात वर्षापासून पलावा पूल रखडल्याने प्रवाशांना वाहन कोंडीचा जो त्रास सहन करावा लागतो. या नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहेत.दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट.
जिल्ह्यातील कल्याण-शिळ महामार्ग हा एक महत्वाचा रस्ता आहे. प्रवाशांसह लांब पल्ल्याची मालवाहतूक या रस्त्याने होत असते. सात वर्षांपासून या रस्त्यावरील पूल रखडविण्यात आला आहे. हे सर्वांनाच लांच्छानास्पद आहे. या संदर्भात लोकांच्यासाठी आम्ही या आंदोलनात सहभागी झालो.राजू पाटील, मनसे नेते तथा माजी आमदार.