कृत्रिम वने pudhari file photo
ठाणे

ठाणे : पालघरच्या समुद्रकिनारी उभारणार मियावाकी उद्यान

पुढारी वृत्तसेवा

पालघर : गुजरात राज्यातील किनारी भागात असलेल्या नारगोळ येथील मीयावाकी उद्यानाच्या धर्तीवर पालघर तालुक्याच्या समुद्रकिनारी कृत्रिम वन उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या उपक्रमामुळे पालघर तालुक्याच्या नवापूर किनारी कृत्रिम वनांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे भविष्यात येथील पर्यटनाला वाव मिळणार आहे.

नवापूर गावाच्या दांडीखाडी नाक्याजवळ गावाच्या मालकीच्या 13 एकर जमिनिपैकी सात एकरच्या जवळपास क्षेत्रावर एचडीएफसी बँकेच्या सामाजिक दायित्व निधी मधून हे वन उद्यान उभारला जाणार आहे. 90 प्रजातीच्या एक लाख आठ हजार झाडांची लागवड केली जाणार असून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या उपक्रमासाठी लागणार आहे. वन उद्यानाच्या रोपे लागवड क्षेत्रात कुंपण घालणे, ठिबक सिंचनने रोपांना पाणी देणे असे प्रयोजन आहे.

नवापूरच्या गाव तलावातून नव्याने लागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यात येणार असून त्याच्या संगोपनासाठी मनुष्यबळ एचडीएफसी बँक पुरवणार आहे. वन उद्यानाच्या विकासानंतर हे उद्यान सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल. उद्यानाच्या विकासामुळे येथे वैविध्यता येणार असून विविध पक्षी वास्तव्यास येतील. त्यामुळे हे वन उद्यान भविष्यात पर्यटनाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नवापूर सरपंच अंजली बारी तसेच फॉरेस्ट क्रिएटरचे संस्थापक आर.के नायर यांनी व्यक्त केली आहे.

वनांमुळे गावात पर्यटकांचा ओघ वाढला

गुजरातमधील नारगोळ या किनारी भागात सर्वात मोठे कृत्रिम वन फॉरेस्ट क्रियेटर्स संस्थेच्या आर.के नायर व सहकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले आहे. तेथे 93 प्रकारच्या देशी प्रजातींची एक लाख 20 हजार झाड लावली गेली. जपानी तंत्रज्ञानावर आधारित हे मियावाकी कृत्रिम वन आहे. पाण्याच्या स्वतंत्र स्त्रोत्रही तेथे निर्माण करण्यात आले आहे. या वनांमुळे गावात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवापूर गावाच्या पर्यटनाला चांगली चालना मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT