Thane : अल्पवयीन विद्यार्थीनीचा तरूणाकडून विनयभंग  File Photo
ठाणे

Thane : अल्पवयीन विद्यार्थीनीचा तरूणाकडून विनयभंग

Molestation Case: कल्याण-शिळ महामार्गावर धावत्या बसमध्ये लगट

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील लोढा-पलावा येथील लोढा ॲव्हेन्स बस थांबा ते कल्याणमधील बिर्ला महाविद्यालय दरम्यान बसने प्रवास करत असताना एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा एका 20 वर्षीय तरूणाने विनयभंग केला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार धावत्या बसमध्ये घडला आहे. या प्रकरणी पिडीत विद्यार्थीनीने सुरूवातीला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तथापी ही घटना कल्याण-शिळ महामार्गावर घडल्याने हा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

अल्पवयीन विद्यार्थीनीने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास लोढा ॲव्हेन्स ते कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयाच्या दरम्यानच्या बसमध्ये प्रवास करत असताना या बसमध्ये बसलेला एक तरूण या विद्यार्थीनीकडे पाहून सारखा हसत होता. बस डोंबिवलीजवळच्या पिसवली भागातील टाटा नाक्यावर येताच तरूणाने विद्यार्थीनीचा हात पकडला. मात्र विद्यार्थीनीने हात झटकून त्याला दूर केले.

अल्पवयीन विद्यार्थीनी कल्याणमध्ये बसमधून उतरल्यानंतर तरूण आपण पुन्हा भेटू् असे बोलू लागला. विद्यार्थीनी महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना तरूण पुन्हा पाठलाग करत तिच्याकडे मोबाईल क्रमांंक, इन्स्टाग्राम आयडी मागू लागला. आपल्याकडे इन्सटाग्राम आयडी नाही असे सांगून विद्यार्थीनीने स्वत:चा मोबाईल तरूणाला देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरूणाने विद्यार्थीनीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमध्ये स्वत:चा मोबाईल नंबर डायल करून आपला मोबाईल क्रमांक विद्यार्थीनीला देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराने विद्यार्थीनी घाबरली होती.

क्रमांकावरून आरोपीचा शोध सुरू

तरूणाकडून काही गैरकृत्य होण्याची शक्यता असल्यामुळे पालकांशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार विद्यार्थीनीने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. मात्र हा सारा प्रकार कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवलीजवळच्या पिसवली भागातील टाटा नाक्यादरम्यान घडल्याने हा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शहादेव पालवे आणि त्यांचे सहकारी तरूणाच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT