ठाणे : सप्टेंबरमध्ये मेट्रोचा ट्रायल रन घेण्याचा आमचा मानस असून या वर्षाअखेर मेट्रो सुरु करण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संपूर्ण एमएमआर रिजनमध्येच मेट्रोचे जाळे मजबूत करणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
ठाणे वर्षा मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. वडाळा ते कासारवडवली अशी मुख्य मेट्रो- ४ ही ठाण्यातून जात असून या मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. दिवस आणि रात्रीचे देखील मेट्रोचे काम सुरु असून ही मेट्रो कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेट्रो सुरु झाल्यानंतर घोडबंदर मार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.मात्र ही काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोबाबत महत्वाची माहिती दिली असून येत्या वर्षाअखेर मेट्रो सुरु करण्याचा मानस शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मेट्रोचे जाळे एम एम आर क्षेत्रात मजबूत करत आहोत, जेणेकरून रस्त्यावर येणारी वाहतूक कमी होईल तसेच लोक मेट्रोमध्ये प्रवास करतील असे शिंदे यांनी सांगितले.
सप्टेंबर अखेरपर्यंत मेट्रोची ट्रायल रन व्हावी असा प्रयत्न आमचा आहे. मेट्रोचा ट्रायल रन झाल्यानंतर वर्षा आखेरीस सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुख्य मेट्रो वडाळा ते घोडबंदर, दहिसर मीरा-भाईंदर आणि पुन्हा मुंबई असा जो रस्ता आहे त्याला देखील आम्ही अंतर्गत मेट्रोने जोडणार असल्याचे शिंदे म्हणाले. ठाण्याची अंतर्गत मेट्रो मंजूर झाली आहे, पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाण्यातले जे नागरिक आहेत त्यांना मुख्य मेट्रोशी जोडण्यासाठी ही अंतर्गत मेट्रो खूप महत्वाची ठरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी दूर करणे हा एकच टास्क...
महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना वाहतूक कोंडी दूर करणे हा एकच टास्क दिलेला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. परवाच मी घोडबंदर गायमुख रस्त्याची पाहणी देखील केली. काही काळानंतर ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर झालेली दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई ते कोस्टल रोड, मुंबई ते आनंद नगर, आनंद नगर ते साकेत ते गायमुख, गायमुख ते फाउंटन अशा प्रकारचा कोस्टल हायवे आम्ही करत आहोत, त्यामुळे ठाण्यात येणारी वाहतूक, आमदाबाद कडून येणारी आणि ठाणे ते आमदाबाद कडे जाणारी वाहतूक पूर्ण बायपास होऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.