ठाणे : वडाळा-घाटकोपर ते कासार- वडवली अशा ठाण्यातून जाणार्या मुख्य मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो मार्गाला राज्य शासनाकडून गती मिळाली आहे. तब्बल 12 हजार 500 कोटींचा प्रकल्प असलेल्या या मेट्रोला केंद्र सरकारकडून यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. आता राज्य शासनाकडूनही केंद्र, राज्य आणि महामेट्रो अशा त्रिस्तरीय करारनामा करण्यास मान्यता मिळाली असल्याने अंतर्गत मेट्रोसाठी हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
एमएमआरडीएच्या वतीने वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली पुढे गायमुख या मुख्य मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या मेट्रोला जोडण्यासाठी तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात अंतर्गत मेट्रोची आखणी केली होती. महामेट्रो कंपनीकडून या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार केला होता. मात्र अंतर्गत मेट्रो हा अधिक खर्चिक असल्याचे सांगत केंद्राने अंतर्गत मेट्रोऐवजी एलआरटी प्रकल्प राबवण्याच्या सूचना ठाणे महापालिकेला केल्या होत्या. वर्तुळाकार मेट्रो हा प्रकल्प 13 हजार कोटींचा होता, तर एलआरटी प्रकल्पाची किंमत ही 7 हजार 165 कोटींच्या घरात होती. त्यामुळे एलआरटीमुळे सुमारे 5 हजार कोटींची बचत होणार होती. तसा प्रस्तावही पालिकेने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता.
मात्र भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता एलआरटी प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे मत केंद्राने नोंदवल्याने केंद्राच्या सूचनेनंतर पुन्हा अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविला होता. त्यानंतर केंद्रानेही अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे. आता केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य आणि महामेट्रो यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करावा लागणार असून त्यासाठी महामेट्रोने कराराचा मसुदाही तयार करून तो शासन मान्यतेसाठी सादर केला. त्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता देऊन त्यासंबंधीच्या अध्यादेश काढला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला खर्या अर्थाने चालना मिळाली आहे.
वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाई नगर, गांधी नगर, मानपाडा, डोंगरीपाडा वाघबीळ, आझाद नगर, मनोरमा नगर, कोलशेत, बाळकूम, राबोडी, ठाणे स्टेशन.
एकूण 29 किमी लांबीच्या या प्रकल्पात 26 किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून 3 किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण 22 स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत. अंदाजे 7. 61 लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार आहे. ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोळशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार आहे. 2029 पर्यंत मेट्रोची सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.