डोंबिवली : मेट्रोची कामे सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून कल्याण-शिळ महामार्ग वाहतूक कोंडीत अडकला आहे. प्रवासी आणि वाहतूकदारांचा वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. शिवाय महामार्गाच्या दुतर्फा राहणारे रहिवासी देखिल या वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आले आहेत. वाहतूक कोंडीला मेट्रो कामातील टक्केवारी जबाबदार असून टक्केवारीच्या विळख्यातून बाहेर पडल्यावरच कल्याण-शिळ महामार्ग मोकळा श्वास घेईल, असे मनसचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वाहतूकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलिसांचे हाल होत आहेत. मेट्रो कामातील अधिकाऱ्यांसह सत्ताधाऱ्यांची टक्केवारी हे वाहतूक कोंडीमागील मुख्य कारण असल्याचा गौप्यस्फोट करून मनसचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळ उडवून दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात आपण वारंवार एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रकल्पातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत. तथापी या बद्दल कुणीही काहीच बोलत नाहीत. कारण मेट्रोच्या कामामध्ये सत्ताधाऱ्यांबरोबर सगळ्यांनीच हात धुऊन घेतले आहेत. कल्याण-शिळ महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे साऱ्यांनाच प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र याविषयी कुणी अधिकारी वा सत्ताधारी काहीही बोलण्यास तयार नाही, अशी माहिती माजी आमदार राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.
मेट्रो मार्गावरील कल्याण-तळोजा रस्त्याचे अद्याप भूसंपादन झालेले नाही. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा किती मोबदला मिळेल हे नक्की नाही. मोबदला मिळाल्याशिवाय शेतकरी त्यांची एक इंचही जमीन मेट्रो प्रकल्पासाठी देण्यास तयार नाही. मग कल्याण-शिळ महामार्गावर गेल्या वर्षभरापासून मेट्रोच्या कामांची का घाई केली जाते ? असा सवाल मनसे नेते राजू पाटील यांनी उपस्थित केला. ही कामे आधी तळोज्यापासून वर्दळ नसलेल्या मोकळ्या भागात सुरू करावी. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात वर्दळीच्या कल्याण-शिळ महामार्गावर मेट्रोची कामे सुरू करा, असे आपण वारंवार सांगत आहोत. मात्र त्याची कुणी दखल घेत नाही. या प्रकरणात सगळ्यांचे चांगलेच मुखलेपन झाल्याची टीका राजू पाटील यांनी केली.
कल्याण-शिळ महामार्गावर मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू करण्यापूर्वी या रस्त्याला काही पर्यायी रस्ते मार्ग मेट्रो कंपनीने एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे आवश्यक होते. तथापी अशी कोणतीही सुविधा न देता कल्याण-शिळ महामार्गावर मेट्रोची कामे सुरू केल्याने २४ तास हा महामार्ग वाहतूक कोंडीत अडकलेला असतो. यात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांची काहीही चूक दिसून येत नाही. उलट वाहतूक कोंडीमुळे पोलिस निष्कारण कामाला लागले आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी दहा फुटाचा भाग दोन्ही बाजूंनी बंद केला होता. मुख्य रस्त्यावर एक वाहन जाईल एवढीच जागा शिल्लक राहते. वाहतुकीची कोंडी करणारे मेट्रोचे पत्रे वाहतूक पोलिसांनी एकदा जेसीबी लावून तोडून टाकले होते, असेही राजू पाटील म्हणाले.
वेगवेगळ्या भागातून अनेक परप्रांतीय कल्याण-डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागात येऊन राहत आहेत. त्यांच्यामुळे अनावश्यक भार रस्ते, वीज, पाणी, वैद्यकीय सेवांसह सर्वच नागरी सुविधांंवर पडत आहे. त्यामुळे परप्रातांतून आलेल्यांना प्रथम आपल्या भागातून हुसकावून लावले पाहिजे. शासन/प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नाही. मात्र मूलभूत सुविधांचा विचार करून परप्रांतियांना हुसकावून लावण्याची भूमिका घेतली की मनसेला प्रांतवादी ठरविले जाते. मात्र त्यामागचा उद्देश कुणी समजून घेत नाही. उलट त्याला राजकीय रंग दिला जातो, असे कटू सत्य राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उघड केले.