मोखाडा : हनिफ शेख
संपूर्ण देश नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच मोखाडा तालुक्यात एक हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूच्या विळख्यात सापडलेल्या मोखाडा तालुक्यात पुन्हा एकदा एका मातेचा मृत्य झाला असून बाळ मात्र सुखरूप आहे.
तालुक्यातील कोलाड्याचा पाडा येथील आशा नामदेव भुसारा (22) या महिलेची दि.26 रोजी प्रसूती झाली मात्र त्यानंतर तिला मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाल्यामुळे मोखाडा ते जव्हार आणि जव्हार ते नाशिक या प्रवासातच तिची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून या नव्या सरकारने किमान जीव वाचू शकेल, अशी सक्षम आरोग्य यंत्रणा तरी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आशा भुसारा या गरोदर मातेला 24 तारेखला पोटात दुखू लागल्यामुळे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर दोन दिवसांनी 26 तारखेला सकाळी 9 च्या दरम्यान तिची प्रसुती झाली. मात्र त्यानंतर तिचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यासाठी आवश्यक उपाययोजना करूनही परिस्थिती बिकट झाल्याने तात्काळ तिला 10: 30 वाजेच्या दरम्यान जव्हार कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी रक्त चढवणे आणि बाकी उपचार करण्यात आले, मात्र सदरची माता बेशुद्ध झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याने तिला 1 : 30 वाजेच्या आसपास नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. मात्र नाशिकच्या अलीकडेच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तिचे बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा मृत्यू सरकारी यंत्रणांच्या अपयशामुळे झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. मुळात आजवर अनेक माता आणि बालके यांचा मृत्यू झालेला आहे. मात्र या निष्पाप लोकांची जीव वाचावणारी सक्षम यंत्रणा याठिकाणी उपलब्ध न झाल्याने अजून किती दिवस येथील लोक किड्या मुंग्यांप्रमाणे मारणार आहेत हा खरा प्रश्न आहे. मुळात अद्ययावत ऑपरेशन थिएटर, ते सांभाळणारे तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक स्टाफ अशी सगळी यंत्रणा उपलब्ध असती तर कदाचित अशा कित्येक आशा आज जिवंत पहावयास मिळाल्या असत्या.
20 ते 30 हजार महिलांमधून क्वचितच असे होते. कारण नैसर्गिक प्रसुती झाल्यानंतर आपोआप गर्भ पिशवी कड्क होते किंवा आकुंचन पावते.यामुळे असा रक्तस्त्राव थांबतो मात्र या बाबत तसे घडले नाही. यामुळे तिला जव्हार येथे चार पिशवी रक्त उपलब्ध करून देण्यात आले शिवाय या केस मध्ये पोट फाडून काही शस्त्रक्रिया कराव्या लागतात मात्र रुग्ण बेशुद्ध झाल्याने भुल देता येणे शक्य नाही. यामुळे असे ऑपरेशन करणारी यंत्र सामग्री याठिकाणी उपलब्ध नसल्याने तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. आम्ही सर्व स्टाफ डॉक्टर यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते.डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा
या मातेचा नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहचण्याच्या अगोदरच मृत्यू झाला मात्र त्यानंतरही पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी थेट घरी न आणता तिला या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे या पार्थिवास लवकर कोणी हात लावण्यास तयार नव्हते. एक दिवसाचे बाळ आणि मृत आईला घेवून रुग्णालयाच्या मजल्या मजल्यावरून वर खाली प्रवास हे नातेवाईक करीत होते,असे आशाचा पती नंदकुमार भुसारा याने दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. यामुळे मृत्युनंतर सुध्दा सरकारी अनास्था छळण्याचे काम सोडत नाही असेच यातून दिसून येत आहे.