ठाणे : कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या मागील तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार असा त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 647 अंगणवाडीतील 83 हजार 427 बालकांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तसेच दत्तक पालक योजना, पालकसभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ठ आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबई सारख्या नामांकित संस्थाचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडीओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे.
गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूती नंतर मातांना व सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बाळंतवीडा, कुपोषित मुलांना पोषकवडी, स्तनदा मातांना पाळणा इ. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर विविध स्वंयसेवी संस्था (उदा.स्नेहा फाऊंडेशन, अन्नदा फाऊंडेशन इ.) च्या मदतीने डोळखांब/ शहापूर प्रकल्पातील कुपोषित बालकासाठी कामकाज करण्यात येत आहे. परिणामी प्रतीवर्ष कुपोषीत बालकांमध्ये सुधारणा टक्केवारीत वाढ होत आहे.
ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे. कुपोषण निर्मूलनासाठी त्रिसूत्रीचा पॅटर्न प्रभावी ठरेल. कुपोषण मुक्तीसाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
महिना तीव्र कुपोषित मध्यम कुपोषित
सप्टेंबर 88 1023
ऑक्टोबर 76 1009
नोव्हेंबर 66 961