बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे. (File Photo)
ठाणे

Badlapur Accused Encounter : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, FIR नोंदवणार

Badlapur Accused Encounter | या प्रकरणाचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Badlapur Accused Encounter) याच्या एन्काउंटर प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे. ठाणे दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून तसे निष्पन्न झाले आहे. हा अहवाल आज सोमवारी सीलबंद लिफाफ्यात मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालानुसार, पोलीस ही परिस्थिती योग्यरित्या हाताळू शकले असते. त्यांनी बळाचा वापर करणे योग्य ठरू शकत नाही.

या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची सूचना केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अक्षय शिंदे याला एन्काउंटदरम्यान गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. त्यावेळी तेथे पाच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Badlapur sexual assault case : नेमकं काय घडलं होतं?

ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. मुंब्रा बायपासवर झालेला हा एन्काउंटर वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. या एन्काउंटरदरम्यान एकूण चारवेळा गोळीबार करण्यात आला होता. त्यातील तीन राऊंड हे आरोपी अक्षय शिंदे याने झाडले; तर एक राऊंड स्वरक्षणार्थ एसआयटी पथकातील संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडला आणि एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.

या प्रकरणी सोमवारी ठाणे दंडाधिकाऱ्यांनी त्यांचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. शिंदे याचे वडील अण्णा शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, त्यांच्या मुलाला पोलिसांनी फेक एन्काउंटरमध्ये मारण्यात आले.

ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरच्या एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे (२४) याला अटक केली होती. तर सप्टेंबरमध्ये त्याचा एन्काउंटरदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाच पोलिस अधिकारी आरोपीच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष दंडाधिकाऱ्यांनी काढला आहे. आता या पाच पोलिसांविरोधात एफआयआर नोंदवले जाईल आणि त्यानंतर चौकशी केली जाईल, असे खंडपीठाने नमूद केले.

'पिस्तुलावर शिंदेच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत'

एन्काउंटदरम्यान वापरलेल्या पिस्तुलावर शिंदेच्या बोटांचे ठसे आढळून आलेले नाहीत. तसेच बंदुकीच्या गोळीचे कोणतेही अवशेष सापडलेले नाहीत. ज्यामुळे बळाचा वापर करणे योग्य नव्हते, असे सूचित होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT