ठाणे : गेल्या 100 वर्षात आत्तापर्यंत एकदाही ठाणे शहराला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला नाही याची दखल घेऊन किमान जानेवारी 2027 मध्ये पुणे येथे होणार्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाणे शहरातील साहित्यिकाला बहुमान मिळावा अशी मागणी ठाणे शहरातील साहित्यिक, रसिक-वाचक, साहित्यप्रेमी, सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार, उद्योजक, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे केली आहे,अशी माहिती स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे चे अध्यक्ष, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे चे माजी अध्यक्ष व प्रकाशक विद्याधर ठाणेकर यांनी केली आहे.
आज ठाणे शहरात असंख्य लोकप्रिय व प्रसिद्ध साहित्यिक वास्तव्यात त्यात प्रामुख्याने अनंत देशमुख, प्रविण दवणे, अशोक बागवे, अशोक समेळ, अरुण म्हात्रे इत्यादी. यांच्या साहित्याचे योगदान मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आहे. या प्रत्येक साहित्यिकांची साहित्य संपदा ठाणे शहराची शान उंचावत आहेत. त्यांचे असंख्य वाचक, चाहते संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत.
या पूर्वी ह्या 100 व्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे भाग्य ठाणे शहराला मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. पण पाल कुठे शिंकली ते कळले नाही, आणि हे संमेलन पुणे शहराला मिलला. असो. आतातरी किमान संमेलनाचे अध्यक्षपद तरी द्यावे अशी विनंती ठाणे शहरातील सर्व नागरिकांतर्फे करण्यात आलेल्या मागणीचा गांभिर्यपूर्वक विचार करावा अशी पुन्हा एकदा विनंती विद्याधर ठाणेकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चे अध्यक्ष यांना केली आहे.