ठाणे : अनुपमा गुंडे
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या ग्रंथालय संचालनालयासाठी सुमारे 200 कोटींहून अधिक, तर मराठी भाषा विभागासाठी अंदाजपत्रकीय तरतूद त्यापेक्षा कमी असल्याने हे संचालनालय मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्याच्या राजकीय हालचाली सध्या सुरू आहेत.
ग्रंथालय संचालनालयाचे कार्य हे फक्त मराठी भाषेपुरतेच मर्यादित नसल्याने हे संचालनालय मराठी भाषा विभागाकडे वर्ग झाल्यास भाषिक मर्यादा येणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा, साहित्यप्रेमींचा त्याला विरोध आहे.
ग्रंथालय संचालनालय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कला व संस्कृती विभागांतर्गत कार्यरत आहे. तथापि, मराठी भाषा विभागाचे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे. ग्रंथालय संचालनालय हे मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्याची चर्चा गेल्या वर्षी अधिवेशनात झाली होती. मात्र, कागदोपत्री काही हालचाल नव्हती. आता पुन्हा संचालनालय मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ग्रंथालयात त्या-त्या विभागाच्या गरजेनुसार देशातील बहुतेक भाषांची पुस्तके असतात. याशिवाय हिंदी-इंग्रजीची पुस्तके असतात. मराठी भाषा विभागाकडे ग्रंथालय संचालनालय वर्ग झाल्यास या भाषिक पुस्तकांचे काय होणार हा प्रश्न आहे. कारण मराठी भाषा विभागाचे कार्य हे महाराष्ट्रापुरते, ते ही मोठ्या शहरांतच आहे. त्यामुळे असे झाल्यास ग्रंथालयांच्या भाषिक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.