डोंबिवली : स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही संविधानातील मानवीमूल्ये स्वतःत रुजवून देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपण कटीबद्ध होणे गरजेचे आहे. म्हणूनच भारताचा उत्तम नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्याना 100 मार्कांसाठी नागरिकशास्त्र व इयत्ता पाचवीपासूनच कायदा हा विषय अनिवार्य करायला हवा. आपले संविधान आपल्या देशाचा आत्मा व श्वास आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या अभिवक्त्या मंदाकिनी पाटील यांनी कल्याणात बोलताना केले.
सार्वजनिक वाचनालय कल्याण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमालेंतर्गत संविधान दिनाच्या कार्यक्रमात अभिवक्त्या मंदाकिनी पाटील उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होत्या. या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधानाचे औचित्य साधून माझे संविधान-काव्य महोत्सव आयोजितकरण्यात आले होते.
भारतीय संविधान, बीजे रोवली ती लोकशाहीने, आपले संविधान अशा संविधानाच्या गौरवात्मक कवितेचे सादरीकरण उपस्थित कवींनी केले. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्षा आशा जोशी, सरचिटणीस भिकू बारस्कर, चिटणीस निलिमा नरेगलकर, कार्यकारणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, कवि दिप जगदेव भटू, ज्येष्ठ कवी राजरत्न राजगुरू, सुधाकर वसईकर, सुधीर चित्ते, सुरेखा गायकवाड, वाचनालयाच्या ग्रंथसेविका आणि काव्यप्रेमी उपस्थित होते. ज्येष्ठ कवी संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माझे संविधान-काव्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला.