डोंबिवली जवळच्या कोपर गावाजवळ असलेल्या खाडीत भराव टाकण्याच्या गोरखधंद्याला भूमाफियांनी वेग दिला आहे. Pudhari News Network
ठाणे

ठाणे : डोंबिवली जवळच्या कोपर किनारपट्टीत भूमाफियांचे धाडस

बेकायदा चाळींच्या उभारणीसाठी खाडीत डेब्रिजचा भराव; केडीएमसी व महसूलसह पोलिसांना खुले आव्हान

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील कोपरगावाजवळून वाहणाऱ्या उल्हास खाडीच्या किनारपट्टीची खारफुटी तोडून या भागातील खाडीचे अंतर्गत प्रवाह बांधकामांचा टाकाऊ मलबा अर्थात डेब्रिज टाकून बुजविण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

खाडी किनारपट्टीचा मुख्य भाग आणि अंतर्गत प्रवाहांवर भरदिवसा सिमेंट, विटा, तुटलेल्या लाद्यांचा मलबा आणून टाकला जात आहे. त्यानंतर रात्रीच्या सुमारास हा मलबा जेसीबीच्या साह्याने सपाट करून त्यावर बेकायदा चाळी उभारण्याचे धाडस भूमाफियांनी सुरू केले आहेत. केडीएमसी आणि महसूल विभागासह पोलिसांना या बदमाशांनी खुले आव्हान दिले आहे.

पश्चिम डोंबिवलीत उल्हास खाडीवर मोठागाव-माणकोली उड्डाण पूल सुरू झाल्यापासून मोठागाव, रेतीबंदर, जुनी डोंबिवली, कोपरगाव भागातील जमिनींचे दर वाढले आहेत. या परिसरातून टिटवाळा-कल्याण परिसरातून केडीएमसीचा बाह्य वळण रस्ता जातो. भूमाफियांनी आपली वक्रदृष्टी कोपर गावातील खाडी किनारपट्टीच्या जमिनींवर वळवली आहे. खाडी किनारपट्टीचा परिसर मलबा आणि मातीचा भराव टाकून बुजवून टाकायचा आणि तेथे बेकायदा चाळी उभारायच्या, असा माफियांनी उद्योग सुरू केला आहे. भूमाफियांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, महसूल आणि पोलिसांना अंधारात ठेवून कोपर गावाजवळच्या खाडी किनारपट्टीचा परिसर भराव टाकून बुजविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. भराव टाकताना अडथळा येणाऱ्या खारफुटी झाडांची देखील कत्तल करण्यात येत आहे.

डोंबिवली पश्चिमेत कोपरगाव, मोठागाव, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, देवीचापाडा हा एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. या हरितपट्ट्यांमुळे विविध प्रकारची जैवविविधता या भागात पाहण्यास मिळते. स्थलांरित पक्षी या भागात येतात. हा एकमेव हरितपट्टा नष्ट झाला तर या भागातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होईल. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास नष्ट होतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. भूमाफियांनी सर्व नियम पायदळी तुडवून कोपर गाव परिसरात खाडी किनारपट्टीत सुरू केलेली मलब्याची भरणी महसूल, महानगरपालिका आणि पोलिसांनी तात्काळ थांबवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

भूमाफियांनी सर्व नियम पायदळी तुडवून कोपर गाव परिसरात खाडी किनारपट्टीत मलब्याची भरणी सुरू केली

कोपर गावाजवळ असलेल्या खाडी किनारपट्टी भागात यापूर्वी बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या चाळींमधील रहिवासी घरासह परिसरातील कचरा खाडीत, तसेच किनारपट्टीत फेकून देतात. परिणामी त्यामुळे जलप्रदूषण देखिल वाढले आहे. स्थानिक पातळीवर भूमाफियांची दहशत असल्याने त्यांच्या खाडी किनारपट्टीचा परिसर बुजविण्याच्या प्रकाराला कुणीही रहिवासी वा पर्यावरणप्रेमी विरोध करत नाहीत. डोंबिवलीच्या विविध भागातील रहिवासी दररोज सकाळ-संध्याकाळ खाडीच्या किनारपट्टी परिसरात फिरण्यासाठी येतात. या रहिवाशांनी खाडी किनारी खाडी बुजविण्याच्या भूमाफियांच्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रहिवाशांनी खाडी किनारी खाडी बुजविण्याच्या भूमाफियांच्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कोपर गावाजवळची खाडी किनारपट्टी डेब्रिज टाकून बुजविण्याचा प्रकार सुरू असेल तर याप्रकरणाची माहिती काढून संबंधितांवर कारवाई केली जाईल. गेल्या वर्षी देवीचापाड्यातील जेट्टी येथे खारफुटी तोडून खाडी किनारा बुजवून मातीचा भराव टाकण्याची कामे भूमाफियांनी सुरू केली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी महसूल विभागासह वन आणि कांदळवन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल महसूल विभागाने घेऊन भराव टाकणाऱ्या अज्ञात माफियांच्या विरोधात स्थानिक विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून खाडीची किनारपट्टी बुजविण्याचा प्रकाराला चाप बसला होता. आता कोपर गावाजवळ असलेल्या खाडी किनारपट्टीत भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT