ठाणे : आधीच पावसामुळे ठाणेकर हैराण असताना, इमारतींच्या खोदकामातून निघणारी माती रस्त्यावर सांडल्याने कोपरी परिसराचे परिवर्तन चिखलाच्या दलदलीत झाले आहे. या चिखलामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी, चाकरमानी तसेच दुचाकीस्वारांचा अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. रस्त्यावरून जाणं म्हणजे आता ‘धोका पत्करून प्रवास’ असं झालं आहे.
पुनर्विकास प्रकल्पांच्या कामासाठी दररोज सकाळपासून उशिरापर्यंत चालणाऱ्या खोदकाम आणि डंपर वाहतुकीमुळे रस्त्यावर मातीचा थर साचतो. त्यावर पावसाचे पाणी पडताच चिखल तयार होतो आणि वाहतूक विस्कळीत होते. दुचाकी घसरणे, कपडे मळणे अशा घटना आता रोजच्याच झाल्या आहेत. काही ठिकाणी चिखलात घसरून नागरिक किरकोळ जखमीही झाले आहेत.
कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. परंतु या कामांची योग्य देखरेख नसल्याने रस्ते दलदलीसारखे बनले आहेत. डम्पर चालकांनी बांधकाम माती वाहून नेताना झाकण न लावल्यामुळे रस्त्यावर माती सांडते आणि काही तासांतच रस्ता घसरडा बनतो. तसेच नागरिकांना घराबाहेर पडताना पाय ठेवायलाही जागा नाही.
“पावसाळ्यात चिखल, धूळ आणि वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मात्र संबंधित प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्याआधीच रस्ते दुरुस्ती आणि माती व्यवस्थापनाबाबत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
तातडीनेे पथक नेमण्याची मागणी
स्थानिक नागरिकांनी ठाणे महापालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “दरम्यान महापालिका नागरिकांच्या हालाकीबद्दल मौन का बाळगते?” असा प्रश्न उपस्थित करत रहिवाशांनी माती काढून रस्ते स्वच्छ करण्यासाठी तातडीचे पथक नेमण्याची मागणी केली आहे. कोपरीत पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेली ही चिखलयात्रा थांबवण्यासाठी प्रशासनाने आता तरी जागं व्हावं, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शाळा आणि कार्यालयांच्या वेळेत या रस्त्यांवर मोठी गर्दी होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रिक्षा आणि दुचाकीचालकांनी अशा चिखलमय रस्त्यांवरून जाणं टाळायला सुरुवात केली आहे.सुनील नाईक, ठाणे पूर्व