ठाणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील भैरवगड ते रांगणागड या जवळपास 15 ते 20 किमी सह्याद्री पट्टयात हे ब्लॅक पँथर सापडले आहेत. यामुळे या जंगलाच्या समृद्धतेचा आणखी एक पुरावा मिळाला आहे.
पश्चिम घाटात पट्टेरी वाघांचे अस्तित्वही आढळले आहे. सिंधुदुर्गातील आंबोली हिरण्यकेशी येथे यापूर्वी पट्टेरी वाघ कॅमेर्यात कैद झाला आहे. कुडाळ तालुक्यातील भैरवगड परिसरात ब्लॅक पँथर ही दुर्मिळ जात आढळून आली असून या भागात आता पट्टेरी वाघांबरोबरच दुर्मिळ ब्लॅक पँथरचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीतच या ‘ब्लँक पँथर’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता अद्यापही अबाधित असल्याचे उघड झाले आहे. हा ‘ब्लँक पँथर’ ताडोबा राष्ट्रीय उद्यान, सिंधुदुर्गात तिलारी, आंबोली यासारख्या घनदाट जंगलात सापडतो. मात्र गोवेरीसारख्या कमी जंगलाच्या ठिकाणी मिळालेल्या या ‘ब्लँक पँथर’मुळे जिल्ह्यात अशा दुर्मिळ वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित व पोषक वातावरण असून येथील जैवविविधता वैभवशाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अशा दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी संवर्धन व संरक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
यापूर्वी पश्चिम घाटात समावेश असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी, माणगांव, भैरवगड, दाजीपूर या परिसरात दुर्मिळ प्राण्यांचे अस्तित्व आढळले होते. यामध्ये शेकरु, हरीण, सांबर, पटेरी वाघ, गवे, खवले मांजर, रानडुक्कर, लंगूर, ब्लॅक पँथर या प्राणी जातींचा समावेश होता. पट्टेरी वाघाच्या पाउलखुणा तिलारी धरण परिसर आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील सह्याद्री पटट्यात दोन वर्षापूर्वी आढळल्या आहेत.आंबोली हिरण्यकेशी परिसरात पट्टेरी वाघ असल्याचा पुरावा वनखात्याला मिळाला असून वनविभागाने लावलेल्या कॅमेर्यात हा पट्टेरी वाघ कैद झाला असून संरक्षण गरजेचे झाले आहे.