Kilbil Festival Pudhari News Network
ठाणे

ठाणे : बाल मित्रांसाठी या रविवारी 'किलबिल फेस्टिवल'

Kilbil Festival : रेल्वे मैदानावर येत्या रविवारी मौज-मज्जा-धम्माल-मस्ती

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीकर बाल दोस्तांच्या आवडीचा किलबिल महोत्सव येत्या रविवारी, दि.10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत होणार आहे. पश्चिम डोंबिवलीतील बावन चाळ परिसरात असलेल्या रेल्वे मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.

येत्या रविवारी (दि.10) पुन्हा एकदा धमाल, मौज-मज्जा आणि मस्तीची संध्याकाळ घेऊन येणार आहे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल म्हणजे बाळगोपाळांचे हक्काचे व्यासपीठ मानले जाते. लहान मुलांना खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित या धमाल कार्यक्रमाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. मौज-मज्जा, धमाल आणि मस्तीच्या अविस्मरणीय उत्सवात धाडसी खेळांचे साहस रंगत आणतात. केवळ लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बारा वर्षांपूर्वी डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवलची संकल्पना सुरू केली आहे.

महोत्सवात हे खेळ रंगणार 

मुलांना चित्रकला, टॅटू, कॅरिकेचरसोबत कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी, वायरची खेळणी स्वतः बनवता येणार आहेत. तसेच बोलक्या बाहुल्या, मोझॅक आर्ट, जम्पिंग मून वॉक, बालनाट्य, जादूचे प्रयोग यासारखे कार्यक्रमही पहायला मिळणार आहेत. यंदा थाऊसंड हँड डान्स ग्रुप आणि झिरो डिग्री डान्स हे अद्भुत नृत्य प्रकार उपस्थित बाळगोपाळांना आकर्षित करतील. जायंट पांडा, टेडी बेअर, हेडलेस मॅन, अल्लाउद्दीनचा जिन, आदी विविध बहुरूपी छोट्या दोस्तांच्या चेहेऱ्यावर हास्य खुलवतील. तर साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग सारखे थरारक प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. यंदा दोन सेगवे व्हेईकल्सचा थरार देखिल मुलांना अनुभवायला मिळणार आहे. तांदुळावर नाव कोरणे, मेहंदी, तसेच लाखेच्या बांगड्या बनवून मिळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळ आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा डोंबिवलीकर बाळगोपाळांसाठी मोफत आहेत. अशा या आगळ्यावेगळ्या किलबिल महोत्सवाला छोट्या दोस्तांनी सोबत आपल्या मित्रांना घेऊन यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT