केडीएमसीच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. (छाया : बजरंग वाळुंज)
ठाणे

Thane | कल्याणच्या दिलीप कपोते वाहनतळावर केडीएमसीचा ताबा

1.88 कोटी भाडे थकविणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या दिवंगत दिलीप कपोते वाहनतळाच्या ठेकेदाराने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वाहनतळ शुल्कापोटीचे 1 कोटी 88 लाख 11 हजार 168 रूपयांचे भाडे केडीएमसीकडे जमा केले नव्हते. ही रक्कम भरणा करावी म्हणून ठेकेदाराला प्रशासनाने वारंवार नोटिसा पाठविल्या होत्या. ठेकेदार टाळाटाळ करू लागल्याने गुरुवारी (दि.12) केडीएमसीच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनतळावर जाऊन तेथून ठेकेदाराला काढून टाकण्यासह वाहनतळ कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही केली.

फेब्रुवारी महिन्यातच या वाहनतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. मे. कुमार एन्टरप्रायझेस आणि मे. श्री गुरूदत्त एन्टरप्रायझेस या दोन खासगी एजन्सी संयुक्त भागीदारीमधून हे वाहनतळ चालवित होत्या. फेब्रुवारी 2024 पासून पहिल्या तीन महिन्यांसाठी 94 लाख 5 हजार 584 रूपये दरमहा भाड्याने हे वाहनतळ ठेकेदारांना केडीएमसीने चालविण्यास दिले होते. या वाहनतळावर दुचाक्यांसह जवळपास 2 हजार 780 वाहने ठेवण्याची व्यवस्था आहे. सुरुवातीचे दोन महिन्याचे भाडे ठेकेदारांनी नियमितपणे केडीएमसीला अदा केले. तथापी मे ते नोव्हेंबर या कालावधीतील 1 लाख 88 हजार रूपयांचे भाडे भरण्यास ठेकेदार टाळाटाळ करत होते. ही रक्कम भरणा करावी यासाठी मालमत्ता कर विभागाने ठेकेदारांना नोटिसा पाठविल्या होत्या. तरीही ठेकेदार त्यास दाद देत नव्हता.

आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी ठेकेदार भाड्याची थकित रक्कम भरणा करत नसेल तर त्या वाहनतळाचा ताबा घेऊन ते स्वतः चालविण्यास सुरूवात करावी. तसेच ठेकेदारांचे या वाहनतळावरील नियंत्रण काढून टाकावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, मालमत्ता विभाग उपायुक्त रमेश मिसाळ आणि उपायुक्त अवधूत तावडे यांना दिले. त्यानुसार वाहनतळाचा ताबा घेण्यासाठी उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त सविता हिले, नियंत्रण अधिकारी प्रसाद ठाकूर, अधीक्षक जयराम शिंदे आणि प्रशांत धीवर यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

विशेष पथक तयार करून कारवाई

पंचनामा करत वाहनतळ ताब्यात

केडीएमसीच्या विशेष पथकाने गुरुवारी (दि.12) दुपारी पोलिस बंदोबस्तात दिलीप कपोते वाहनतळावर धडक दिली. सुरूवातीला ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी वाहनतळाचा ताबा देण्यास इन्कार केला. ठेकेदाराच्या महिला कर्मचारी दाद देत नसल्याने उपायुक्त रमेश मिसाळ यांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी संपर्क साधून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातून वाढीव बंदोबस्त मागविला. पोलिसांनी आक्रमक कारवाई करून ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना वाहनतळातून हुसकावून बाहेर काढले. उपस्थितांच्या समक्ष पंचनामा करून पथकाने कपोते वाहनतळाचा ताबा घेतला.

शुक्रवारपासून (दि.13) केडीएमसीच्या चार कर्मचाऱ्यांनी चक्राकार पध्दतीने या वाहनतळावरील नियंत्रणाचे काम सुरू केले आहे. दिलीप कपोते वाहनतळाच्या भाड्याची रक्कम ठेकेदाराने थकवली होती. ठेकेदाराचा करारनामा संपुष्टात आणण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. या दोन्ही ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकून त्यांना अन्य प्राधिकरणांकडे व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आल्याचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT