KDMC  Pudhari
ठाणे

KDMC Property Tax | कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी : महापालिकेकडून मालमत्ता करात ७ टक्क्यांपर्यंत सूट जाहीर

ऑनलाईन बिल भरणा सुविधा सुरु, क्यूआर कोडचा वापर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

KDMC Property Tax Discount

डोंबिवली :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी मोठी बातमी आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची देयके करदात्यांना पाठविण्यात आली आहेत. केडीएमसीने करदात्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. सामान्य करात ५ टक्के सूट आणि ऑनलाईन माध्यमातून कर भरल्यास अतिरिक्त २ टक्के सूट अशी एकूण ७ टक्के सवलत महापालिकेने जाहीर केल्याचे मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.

ज्या मालमत्ताधारकांना अद्याप मालमत्ता कराची देयके प्राप्त झालेली नाहीत, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. केडीएमसीच्या http://www.kdmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर बिल आणि पावती डाऊनलोड या पर्यायावर जाऊन मालमत्ता कर निवडावे. त्यानंतर आपला मालमत्ता क्रमांक नोंदवून देयकाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल.

ऑनलाईन भरणा कसा कराल ? 

महापालिकेने कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. करदात्यांना http://www.kdmc.gov.in या संकेतस्थळावरील त्वरीत भरणा या पर्यायातील मालमत्ता बिलवर क्लिक करून मालमत्ता क्रमांक टाकून ऑनलाईन कर भरता येईल. याशिवाय मालमत्ता कर देयकावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

नागरी सुविधा केंद्रातही व्यवस्था

ज्या करदात्यांना ऑनलाईन भरणा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी केडीएमसीच्या सर्व नागरी सुविधा केंद्रांवर सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. करदात्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कराचा भरणा करून ७ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा आणि महापालिकेच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन कर निर्धारण व संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT