ठाणे

Thane road waterlogging : पहिल्याच पावसात एमआयडीसीचा भोंगळ कारभार उघडा

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका : अधिकाऱ्यांच्या मनमानीने महामार्ग जलमय

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : बुधवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काटई - पाईपलाईन - अंबरनाथ महामार्गावरील नेवाळी नाका परिसर पुन्हा एकदा जलमय झाला आहे. एमआयडीसीच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या गटारकामामुळे पावसाचे पाणी थेट महामार्गावर येऊन वाहू लागल्याने रस्त्याचे अक्षरशः नदीपात्रात रूपांतर झाले आहे. परिणामी सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या हजारो नागरिकांना, कामगारांना आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

वाहतूक पोलीस चौकीच्या मागील भागात तसेच डावलपाडा परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे साचलेले पाणी थेट महामार्गावर आले असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून अनेक चारचाकी वाहने पाण्यातून मार्ग काढताना अडचणीत सापडली होती. महामार्गावरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत असल्याने वाहतूक संथ झाली आणि काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

विशेष म्हणजे, या समस्येबाबत दैनिक पुढारीने यापूर्वीच वारंवार वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र एमआयडीसी प्रशासन तसेच व लोकप्रतिनिधींनी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पहिल्याच दमदार पावसात नागरिकांना पुन्हा त्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे उघडी असल्याने पाण्याखाली ती दिसत नसून अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

सततच्या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कामगार वर्ग, उद्योग क्षेत्रातील कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला आहे. वाहतूक पोलिसांनाही पाण्यात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे.

"दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. गटारांची कामे रखडल्यामुळे आम्हाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला असून आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT