ठाणे : शुभम साळुंके
मलंगगड , उत्तरशीव नद्यांमधील प्रवाही नसलेल्या पाण्यावर तरंगणाऱ्या जलपर्णीचे पुंजके जागोजागी दिसत आहेत. त्यामुळे परिसरात डासांची पैदास दुप्पट होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळच्या सुमारास नागरिकांना घराबाहेर पडणं देखील कठीण झालं आहे. मात्र या जलपर्णीच्या वाढत्या प्रकोपाकडे दुर्लक्ष होत असल्याने उकाड्यासोबत डासांच्या चाव्याने कल्याण ग्रामीण प्रचंड हैराण झाले आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या मलंगगड , उत्तरशीवच्या नदीपात्राला जलपर्णीने वेढले आहे. अंबरनाथ तालुक्यातील पाली गावापासून ते ठाणे तालुक्यातील उत्तरशीव गावापर्यंत जलपर्णीने नदीपात्र व्यापला आहे. नदीपात्रात दिसणारी जलपर्णी आता गावागावातील तलावांसह नाल्यांमध्ये देखील दिसू लागली आहे. त्यामुळे नदी पात्रात जलचरांवर ताव मारणाऱ्या वन्य जीवांची वर्दळ देखील थांबली असून वाढत्या जलपर्णीच्या प्रकोपामुळे नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्व संपुष्टात आलं आहे.
विशेष बाब म्हणजे या जलपर्णीत डासांची उत्पत्ती दुप्पट होत असल्याने त्याचा त्रास आजूबाजूच्या गावांना आणि गृह संकुलाच्या प्रकल्पांना सुरु झाला आहे. आधीच उकाड्याने त्रासलेले नागरिक सायंकाळच्या सुमारास घराबाहेर फेरफटका मारायला निघाल्यास त्यांना प्रचंड डासांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागाचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून नद्यांच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे. नद्यांच्या प्रदूषणावरून राजकारण देखील राज्यात तेवढंच ढवळून निघत आहे. केडीएमसी आणि ठाणे जिल्हा परिषदेसह नवी मुंबई क्षेत्राला वेढलेल्या जलपर्णीच्या वाढत्या प्रवाहाला रोखण्यात शासनाला अपयश आले असल्याचे दिसून आलं आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या गावांसह बाजूच्या गृह संकुलाच्या प्रकल्पांना त्रास होत आहे.
नद्यांच्या माध्यमातून खाडीत प्रवेश करणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा प्रत्यय देखील वडवली गावाजवळ ग्रामस्थांना आला आहे. त्यामुळे या नद्यांचे प्रवाह स्वच्छ करण्यासाठी शासनाने पुढाकार घेत असताना नद्यांमध्ये सोडण्यात आलेल्या सांडपाण्यावर उपायोजना करणे आवश्यक झाले आहे. मात्र या नद्यांच्या स्वच्छतेबाबत शासन आणि लोकप्रतिनिधींना गांभीर्य नसल्याने कल्याण ग्रामीण भागातील नद्या, नाले आणि तलावांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे.
सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडणं देखील अवघड झाल आहे. मोकळा श्वास घ्यायला बाहेर पडलो तर डास चावा घेतात घराचा दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवल्या तर डास घरात प्रवेश करतात. त्यामुळे या डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या जलपर्णी ला नामशेष करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने पाठपुरावा करावा.अनिल प्रजापती,कासा रिओ, रहिवासी
नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे जलचरांसाठी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे दिसून येत आहे. त्यावर ताव मारण्यासाठी श्वानांची फौज जागोजागी नदी पात्रात दिसून येत आहे. त्यामुळे या जलपर्णीवर वेळीच उपायोजना करणे अत्यंत आवश्यक झालं आहे.
सायंकाळच्या आम्ही या नदीच्या किनाऱ्यावर फेरफटका मारायला येतो. मात्र या परिसरात प्रचंड डास त्रास देत आहेत. त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन योग्य त्या उपायोजना कराव्यात.मनीष पवार, रहिवासी