Kalyan Shilphata Traffic Jam Solution
नेवाळी : कल्याण फाटा शिळं फाटा तसेच कल्याण शिळं मार्गावरील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी कल्याण फाटा येथे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यांच्या तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीत सर्वप्रथम कल्याण शीळ मार्ग, कल्याण फाटा - शिळं फाटा परिसर तसेच वाय जंक्शन ते दहिसरदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झालेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गॅरेज, सर्व्हिस सेंटर, कार विक्रेते, दुकाने आणि अन्य व्यावसायिकांनी व्यापलेल्या सार्वजनिक जागा मोकळ्या करून वाहतुकीसाठी रस्त्याची पूर्ण रुंदी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिळफाटा ते शिळ गावदेवी मंदिर दरम्यान अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. तसेच कल्याण फाटा चौकातील धोकादायक खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. याशिवाय वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण फाटा ते महापे या मार्गावर सकाळी ६ ते दुपारी ४ या वेळेत एकेरी वाहतूक, तर दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत महापेकडून कल्याण फाट्याकडे एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवली सह आजूबाजूच्या परिसरातून महापे, वाशी कडे जाणाऱ्या कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज वाहतूक कोंडी पार करून घर आणि काम गाठण्याची वेळ येणाऱ्या कामगार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील रत्याच्या मध्यभागी असलेल्या कल्व्हर्टजवळ आणि कोंडीच्या प्रमुख ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्यात येणार असून राँग साईडने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई व गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी शहर वाहतूक विभाग कर्मचारी, शिळं डायघर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दैनिक पुढारीला मिळाली आहे.
या बैठकीला ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट, डायघर पंचक्रोशी समितीचे संतोष पाटील, भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे महेंद्र पाटील, दक्ष नागरिक संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि नागरिकांच्या हाल अपेष्टांबाबत दै. पुढारीने सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर येऊन ठोस निर्णय घेत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले, तरी या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, याकडे आता लाखो वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिळफाटा , कल्याण फाटा तसेच ठाणे मनपा हद्दीतील कल्याण शील रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात प्रशासकीय यंत्रणा एकत्र आल्या होत्या. कोंडीवर त्यांनी मार्ग देखील काढले आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात केडीएमसी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणा कधी एकत्र येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.