Kalyan Corporator Ramesh Mhatre Released Pudhari
ठाणे

Ramesh Mhatre Released | शास्त्रीनगर रुग्णालय हिंसाचार प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंची आधारवाडी कारागृहातून सुटका

जामिनानंतर म्हात्रे गोव्याच्या दिशेने रवाना; ‘न्यायालयावर माझा विश्वास’ एवढीच प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Shastrinagar Hospital Violence

डोंबिवली : केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घुसून डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची शनिवारी (दि.८) दुपारी आधारवाडी कारागृहातून सुटका झाली. न्यायालयाने म्हात्रे यांच्यासह तीन सहआरोपींना सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर ते कारागृहाबाहेर आले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता, ‘न्यायालयावर माझा विश्वास आहे,’ एवढेच सांगून त्यांनी अधिक बोलण्यास टाळाटाळ केली.

रमेश म्हात्रे (वय ७१) यांच्यासह रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रकाश उद्धव निकम (३५) आणि अक्षय शरद कारंडे (३०) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट त्यांच्यावर घालण्यात आली आहे. त्यानुसार म्हात्रे हे उत्तर गोव्यातील अंजुना परिसरातील एका रिसॉर्टमध्ये वास्तव्य करणार आहेत. तर अन्य आरोपी जवळच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणार असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. सुटकेनंतर चौघेही थेट गोव्याच्या दिशेने रवाना झाले.

आठवड्यातून तीन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी

जामिनाच्या अटीनुसार म्हात्रे यांना मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी अंजुना पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात परतण्याची मुभा असेल. मात्र, खटला सुरू असेपर्यंत दर बुधवारी स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी आणि न्यायालयीन सुनावणीवेळी उपस्थिती बंधनकारक राहणार आहे. तसेच खटला पूर्ण होईपर्यंत पीडित डॉक्टर किंवा साक्षीदारांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचेही निर्देश आहेत.

काय आहे प्रकरण?

६ जुलै रोजी रात्री शास्त्रीनगर रुग्णालयात म्हात्रे यांच्यासह काही जणांनी ऑनड्युटी डॉक्टरांसह तिघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यात एका महिला डॉक्टरचाही समावेश होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाला राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठे पडसाद उमटले. डॉक्टर संघटनांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन दंडाधिकारी न्यायालयातून जामीन मिळवला होता. त्यानंतर डॉक्टर संघटनांनी राज्यव्यापी संपाचा इशारा दिल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत पूर्वीच्या जामिनाला स्थगिती दिली आणि आरोपींना शरण येण्याचे आदेश दिले. त्यानुसार १९ जुलै रोजी म्हात्रे आणि सहआरोपी पोलिस ठाण्यात शरण गेले होते. तेव्हापासून ते आधारवाडी कारागृहात होते. आता सशर्त जामिनावर त्यांची सुटका झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT