पुणे अत्याचाराच्या घटनेनंतर कल्याणात पोलिसांनी रूटमार्च काढत एसटी डेपोची पाहणी केली. 
ठाणे

ठाणे : पुणे अत्याचाराच्या घटनेनंतर कल्याणात पोलिसांचा रूटमार्च

एसटी डेपोतील सुरक्षा यंत्रणेची झाडाझडती

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पुण्यातील स्वारगेट बस आगारात घडलेल्या तरूणीवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांनी गुरूवारी (दि.२७) रुटमार्च काढला. यादरम्यान एसीपी कल्याण घेटे यांच्यासह पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकाने एसटी डेपोची पाहणी करून प्रवाशांशी चर्चा केली. त्यानंतर डेपोतील सुरक्षा रक्षकांकडून माहिती घेण्यात आली.

पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत बसमध्ये प्रवासी तरूणीवर दत्ता गाडे या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी रात्री कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात रूटमार्च काढला. यादरम्यान एसटी बस डेपोत जाऊन तेथील उपस्थित अधिकाऱ्यांशी सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रपाळीच्या वेळी येणाऱ्या आणि सुटणाऱ्या बस गाड्यांची पोलिसांनी माहिती घेतली. यावेळी काही पुरूष प्रवाशांची ओळखपत्रे तपासण्यात आली. तसेच थांबलेल्या सर्व बसगाड्यांची तपासणी करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांची फौज आल्याचे समजताच या परिसरात रेंगाळणारे फायकूट दादा, नशेखोर तरूणांसह उडाणटप्पू तरूणांनी पोबारा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT