Speeding Car Accident Kalyan
डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या निक्कीनगर परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेत एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव सुनील कोळी (२५) असे असून हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर तरुण उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या कमानीमध्ये जाऊन पडला.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हा सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. इतक्यात भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने त्याला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कारचा वेग प्रचंड होता. धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना रस्त्यावर लावलेल्या एका होर्डिंगजवळ घडली असून तरुणाचा मृतदेह कमानीच्या आत पडलेला आढळून आला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सुनील कोळी याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले की, मृत तरुण कामगार होता. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.