Kalyan Dombivli water shutdown
डोंबिवली : कल्याण आणि डोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (दि. ९) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत, अर्थात जवळपास सात तास बंद राहणार आहे. या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांनी आवश्यक पुरेसा पाण्याचा साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीने केले आहे.
कल्याण-डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या १५० दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या मोहिली उदंचन केंद्राशी संबंधित नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र आणि १०० दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथून वीज पुरवठा केला जातो. कांब्याच्या सबस्टेशनमधील एनआरसी-२ फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्याचबरोबर मोहने उदंचन केंद्र व बारावे जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल, दुरूस्तीची कामेही करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत कल्याण (पूर्व-पश्चिम), कल्याण ग्रामीण भाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व इतर गावे), तसेच डोंबिवली (पूर्व-पश्चिम) परिसरात पाणी पुरवठा बंद राहील असे महापालिकेने कळविले आहे.