ठाणे

Thane | कल्याण, अंबरनाथ, बदलापूरकरांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे : तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेतील महत्त्वाच्या टप्प्याला गती

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या स्थानकांतील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या तिसर्‍या चौथ्या मार्गिकेच्या कामातील महत्वाच्या टप्प्याला आता गती मिळाली आहे. या मार्गिकेतील लहान मोठ्या पुलांच्या कामांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 34 कोटींची निविदा जाहीर केली आहे. कार्यादेश दिल्यानंतर वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. येत्या 2026 अखेरपर्यंत या मार्गिका निश्चित वेळेत सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

गेल्या काही वर्षात कल्याणपल्याड वाढलेल्या रेल्वे प्रवासी संख्येमुळे रेल्वे सेवेवर ताण येतो आहे. कल्याण स्थानकातून कर्जत, कसारा दिशेने दोनच रेल्वे मार्गिका आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेला लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकाचा फटका बसतो. कल्याण स्थानकातून अंबरनाथ, बदलापुरच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांचा यामुळे खोळंबा होतो. त्यामुळे या मार्गावर मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 च्या माध्यमातून कल्याण बदलापूर स्थानकादरम्यान 14 किलोमीटर लांबीच्या तिसरी चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकूण 1 हजार 510 कोटी रूपयांच्या खर्चातून या प्रकल्पाची उभारणी केली जाते आहे. गेल्या चार वर्षात या प्रकल्पातील फक्त 25 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. या मार्गात अनेक लहान पूल, रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. यातील पूल आणि इतर कामांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने नुकतीच निविदा प्रकाशित करण्यात आली आहे.

34. 31 कोटी रूपयांच्या या निविदेत पुलांची उभारणी केली जाणार आहे. या मार्गावर एकूण 49 लहान मोठे पूल असून त्यातील काहींचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गिकाच्या कामाला गती मिळण्याची आशा आहे. गेल्या वर्षात वन विभागाच्या जागेची परवानगी मिळाल्याने या कामात गती आली होती. या मार्गिकांच्या पूर्णत्वानंतर उपनगरीय लोकल गाड्यांचा खोळंबा टळणार असून लोकल गाड्यांची संख्याही वाढण्याची आशा आहे.

पुलांची वेगाने उभारणी

या मार्गिकेतील अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील फॉरेस्ट नाका ते टी जंक्शन दरम्यानच्या रेल्वे पुलाचे काम पूर्ण झाले आहे. उल्हासनगरजवळ दोन पादचारी पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. आणखी काही पुलांच्या ठिकाणी कामे सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामडंळाचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे. या प्रकल्पाचे काम निश्चीत वेळेत होईल असेही त्यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT