ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या १८ मृत्यूंच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीची पहिलीच बैठक ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झाली. जवळपास पाच तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मृत्यूंच्या करणासोबतच इतर महत्वाच्या गोष्टींवरही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील आठवड्यात ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच दिवशी १८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर संपूर्ण आठवड्यात २७ रुग्ण दगावले होते. १८ लोकांच्या मृत्यूनंतर कळवा रुग्णालय हे विरोधी पक्षाच्या टार्गेटवर आले होते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः रुग्णांशी संवाद साधून परिस्थिती जाऊन घेतली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाची नऊ सदस्यांची समिती गठीत केली होती. १० दिवसांत या चौकशी समितीला आपला अहवाल सादर करायचा असून गुरुवारी समितीची पहिलीच बैठक ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झाली. या बैठकीत या बैठकीत आरोग्य सेवा आयुक्त, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , महापालिका आयुक्त अभिजित बांगर ,आरोघ सेवा संचालन मुंबई विभागाचे संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार , आरोग्य सेवा सहसंचालक, सहाय्यक संचालक, भीषक तज्ञ आणि उपसंचालक असे समिती सदस्य उपस्थित होते.
सुमारे पाच तास पालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात ही बैठक सुरु होती. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. संध्याकाळी ८ वा. बैठक संपल्यानंतर समितीच्या सदस्यांनी कळवा रुग्णालयात जाऊनही रुग्णालयाची परिस्थिती जाऊन घेतली. येत्या १० दिवसांत म्हणजेच २५ ऑगस्ट पर्यंत चौकशी समितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने चौकशी समितीच्या वतीने तातडीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.