Kalwa Chhatrapati Shivaji Maharaj Hospital
ठाणे : कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कथित निष्काळजीपणा आणि अमानुष कारभारामुळे काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेने ठाणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. “आयुष्मान भारत” योजनेच्या कागदोपत्री प्रक्रियेत रुग्णाला अडकवून वेळेवर उपचार न दिल्याने हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला. या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कळवा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) शेट्टी यांच्या पत्नी संगिता शेट्टी यांना त्रास होत असताना आनंद दिघे हृदयरोग केंद्रात आणण्यात आले होते. मात्र, बेड उपलब्ध असूनही “बेड नाहीत” असे सांगत रुग्णाला प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. प्राथमिक उपचारदेखील न दिल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. “गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. हा केवळ निष्काळजीपणा नसून व्यवस्थेने घेतलेला बळी आहे,” अशी घणाघाती प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिली.
पीडित कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून, कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले असले तरी काँग्रेसने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रुग्णालयात गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल, तर ही व्यवस्था कोणासाठी?” असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ६ जूनपर्यंत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास ठाणे महापालिका आणि रुग्णालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.