ठाणे : कळवा येथील खारीगाव परिसरातील एका सोसायटीच्या आवारात चारचाकी वाहनाने अनेकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण चारचाकी वाहन चालवत होता. सोसायटीच्या आवारातून हायवेकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने परिसरातील नागरिकांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याचा तपास सुरू आहे.या घटनेमुळे खारीगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटीच्या आवारात वाहनांची सुरक्षितता आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.