Thane Drowning Incident: कळवा खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू Pudhari
ठाणे

Thane Drowning Incident: कळवा खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

दीड तासाच्या शोधकार्यानंतर मृतदेह बाहेर काढले

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कळवा रेतीबंदर येथील खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मुंब्रा येथील तिघे मित्र गणेश विसर्जन घाटावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुमारे दीड तास शोधमोहीम राबवून तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोधकार्य सुरू करण्यात आले. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मृतांमध्ये मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरात राहणारे आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) यांचा समावेश आहे. तिघेही मित्र रविवारी दुपारी कळवा रेतीबंदर येथील गणेश विसर्जन घाटावर खाडीत पोहण्यासाठी गेले होते.

दरम्यान, या घटनेची कळवा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. तिघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुंब्रा आणि कळवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT