डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील खडवलीत स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनाराचे अपहरण करून त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर तालुका पोलिसांनी तिघा अपहरणकर्त्याना अटक केली. या अपहरणकर्त्यांनी पैसे न दिल्यास दरीत फेकून देऊ, अशीही धमकी सोनाराला दिली होती. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोनार कशीबशी सुटका करत टिटवाळा पोलिस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांनी वेळ न दवडता या तिघां संशयितांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.
टिटवाळ्यातील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडवली परिसरात उगम चौधरी यांचे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानासमोर एक कार येऊन थांबली. या कारमधून काही तरूण उतरले. उगम चौधरी यांना दुकानातून खेचून बाहेर काढत अपहरणकर्त्यां त्यांना सोबत आणलेल्या कारमध्ये कोंबले. प्रवासादरम्यान अपहरणकर्त्यांनी चौधरी यांना बेदम मारहाण केली. एका निर्जनस्थळी कार थांबवली. त्याठिकाणी चौधरी यांच्याकडे अपहरणकर्त्यांनी दोन लाख रूपयांच्या खंडणीची रक्कम मागितली. पैसे दिले नाही तर दरीत फेकून देण्यात येईल, असे अपहरणकर्त्यांनी धमकावले.
तथापी प्रसंगावधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मोठ्या कौशल्याने सुटका करवून चाैधरी यांनी पोलिस ठाणे गाठले. स्वतःवर बेतलेला प्रसंग त्यांनी पोलिसांसमोर कथन केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंकज गिरी यांनी उगम चाैधरी यांना धीर देत गुन्हा नोंदवून घेतला.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने तपासचक्रांना वेग देऊन संजय पाटोळे, प्रतिक मारू आणि तेजस ठाकरे या तिघा अपहरणकर्त्या खंडणीबहाद्दरांना बेड्या ठोकून गजाआड केले. यातील संजय पाटोळे आणि लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक उगम चौधरी यांच्यामध्ये दागिने गहाण ठेवण्यावरून वाद आहे. या वादाचे रूपांतर दुकानदार चौधरी यांना खंडणीसाठी ठार मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचले. मात्र, चौधरी यांनी अपहरणकर्त्या खंडणीबहाद्दरांच्या तावडीतून स्वतःची सुटका करवून घेतल्याने ते बचावले. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.