मिरा रोड : भारतातील तरुणांना थायलंड व म्यानमार मध्ये नोकरीला पाठवण्याचे सांगत आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणार्या रॅकेटचा मिरा भाईंदर पोलिसांनी पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी स्थानिक एका एजंटला व बँक खात्यात पैसे घेणार्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नोकरीच्या नावाखाली आमिष दाखवून मानवी तस्करी करणारा मुख्य सूत्रधार हा चीन देशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट -1 हे करत आहेत.
या गुन्ह्यातील चीन देशातील यु.यु. 8 या सायबर फ्रॉड करणार्या कंपनीचा लिओ या चिनी नागरिकांचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. त्यात स्टीव्ह आण्णा या भारतीय नागरिकाने भारतीय मुलीच्या नावाने फेसबुकवर खाते उघडले होते. त्याद्वारे भारतीय लोकांशी फ्रेंडशिप करून त्यांचा व्हाट्सअप नंबर मिळवायचा व त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून क्रिप्टोकरन्सी व बिटकॉईन मध्ये इन्व्हेस्ट करायला सांगून फसवणूक करण्याचे प्रशिक्षण घेण्यास भाग पाडत होता.
यामध्ये अडकलेल्या लोकांनी काम करण्यास नकार दिल्यानंतर इमारतीच्या बाहेर जाण्यास सुद्धा अटकाव केला. काम न केल्यास त्यांचा शारीरिक छळ केला त्यानंतर यातुन सुटका करून घेण्यासाठी यातील आरोपींनी प्रत्येकी 7000 अमेरिकन डॉलर्स पाच भारतीय बँक खात्यावर स्वीकारले. त्यानंतर खंडणीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांची म्यानमार देशातून मुक्तता केली. या सायबर फ्रॉड मध्ये अनेक लोक समाविष्ट असल्याची माहिती मिळाली आहे.
नोकरीच्या नावाखाली मानवी तस्करी करून नेलेल्या तरुणांना थायलंड येथे नेऊन पुढे रस्त्यामार्गे बॉर्डर क्रॉस करून म्यानमार येथे नेत होते. त्याठिकाणी आर्म गार्ड व फोर्स मध्ये तरुणांना ठेवून त्यांच्याकडून सायबर फसवणूकी सारखे गुन्हे करून घेत होते. तसेच त्यांनी काम करण्यास नकार दिल्यास त्यांना त्रास दिला जात होता. त्यांना जेवण न देणे, पासपोर्ट जप्त करणे, सुनियोजित कट रचणे असा प्रकार सुरू आहे.
दोन पिडीतांकडून खंडणी वसुली केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. अशा प्रकारे अनेक तरुणांना फसवले आहे, त्रास देण्यात आला व त्यांच्याकडून खंडणी वसुल केली आहे. यामध्ये नोकरीसाठी ज्यांना कॉम्पुटर व सोशल मीडियाचे ज्ञान आवश्यक होते त्यांना नोकरीचे आमिष दाखविले जात होते.
दोन्ही आरोपींना 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
तक्रारदार सय्यद इरतिझा हुसैन व अम्मार लकडावाला यांना ऑगस्ट 2025 मध्ये हैदरी चौक येथे राहणार्या आसिफ खान उर्फ नेपाळी यांनी म्यानमार देशात असलेल्या साथीदार अदनान शेख यांच्या मार्फतीने पाठवले होते. पोलिसांनी आतापर्यंत मोठ्या शिताफीने तपास करत सहा लोकांची ओळख पटवली आहे. त्यातील बरेच युवक अजून तिकडेच आहेत. मानव तस्करी हि मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारात सुरूच आहे.
या गुन्ह्यात आसिफ खान उर्फ नेपाळी ह्याला नयानगर येथून अटक करण्यात आली आहे, तर दुसरा रोहित कुमार मरडाना याला सुरत, गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय टोळीत भारतीय वंशाचे अद्यापपर्यंत 10 ते 12 लोक आहेत अशी माहिती मिळाली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या आंतरराष्ट्रीय मानव तस्करी करणार्या टोळीवर सुद्धा कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले आहे.