डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका pudhari news network
ठाणे

ठाणे : कळव्यातील डॉ.आंबेडकर ग्रंथालयाचे लोकार्पण

रतन टाटांच्या नावे उभारणार ई-लायब्ररी, मोफत पुस्तके उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कळवा येथील कावेरी सेतूवर आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकेचे लोकार्पण सोमवारी (दि.14) करण्यात आले.

कळवा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. ही बाब स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या एका विद्यार्थिनीने डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर डॉ. आव्हाड यांनी जागा मिळवून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही लायब्ररी सुरू केली आहे. हे ग्रंथालय- अभ्यासिका पूर्ण वातानुकूलीत असून सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक पुस्तके सद्यस्थितीत येथे आहे. येथे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ठामपाचे माजी विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील हे मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहेत. सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ही लायब्ररी उघडी राहणार आहे.

लोकार्पणानंतर आमदार आव्हाड यांनी, ’कळवा , खारीगाव, विटावा, पारसिक नगर, कळवा पूर्व येथील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय- अभ्यासिका नसल्याने त्यांना अभ्यासासाठी ठाणे गाठावे लागत होते. प्रवासात वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता. त्यामुळेच आपण ही ग्रंथालय उभारले आहे. या दुमजली वास्तूमध्ये शेकडो विषयांवरील हजारो पुस्तके असून यूपीएससी, एमपीएससीचीही पुस्तके येथे आहेत. तसेच, याच ठिकाणी रतन टाटा ई लायब्ररी देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळेस माजी विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील, प्रमिला केणी, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर मा.नगरसेवक महेश साळवी, नगरसेविका अपर्णा साळवी, प्रमिला केणी, वर्षा मोरे, मनिषा साळवी, आरती गायकवाड, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते.

लवकरच उभारणार वारकरी भवन

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या अभंगांचा, त्यांनी दिलेल्या शिकवणीचा प्रचार - प्रसार व्हावा, या उद्देशाने कळव्यात कावेरी सेतू समोर वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या भवनामध्ये संत साहित्य, संतांचा जीवन प्रवास , संत साहित्य यांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र दालन असणार आहे, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT