डोंबिवली : अठराव्या शतकातील भारतात महिलांना घराच्या चार भिंतींपलीकडे जाण्याची मुभा नव्हती. पण अशा काळातही अहिल्याबाई यांनी महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढाकार घेतला होता. आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह त्यांचे सशक्तीकरण करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंती दिनी शनिवारी (दि.31) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. केडीएमसी मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते.
कल्याणातील अहिल्याबाई चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासही आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अहिल्याबाई होळकर यांचे महिला सशक्तीकरणाचे विचार समाजातील प्रत्येकाने आठवणीत ठेवले पाहिजेत, असेही आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण-डोंबिवली शहर हिंदू खाटीक समाज संघटनेमार्फत आयोजित केलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनी उपस्थितांशी संवाद साधताना केले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव, कल्याण-डोंबिवली शहर हिंदू खाटीक समाज संघटनेचे शहराध्यक्ष समीर मानकर, महिला अध्यक्षा मिनाक्षी खराटे, युवा अध्यक्ष ओमकार निकम यांच्यासह केडीएमसीचे अधिकारी, कर्मचारी, तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.