तलासरी : सुरेश वळवी
तलासरी तालुक्यातील सुत्रकार (डोंगरीपाडा) येथे लोकवस्ती जवळ बेकायदेशीर गौण खनिज खदान आणि क्रेशर मशीन सुरू केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून काम बंद करण्याची मागणी केली आहे. सदर खदान आणि क्रेसार मशीन सात दिवसात बंद न केल्यास आंदोलनाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इशारा दिला आहे.
तलासरी तालुक्यातील मौजे सुत्रकार (डोंगरीपाडा) येथील गट क्र. ३४३/९ या गटातील जमिन ग्रामस्थांच्या दोन तीन पिढ्या पासून कब्जात असुन त्या जमिनीवरती शेतकरी भातशेती लागवड करीत असुन सदर जमिन शेतक-यांना विश्वासात न घेता परस्पर सातबारा विक्री करून नवीन मालकांनी सदर जमिनीवर शेतक-याचा कब्जा काढण्यासाठी तेथील काही अधिका यांना हाताशी घेऊन व तसेच ग्रामपंचायतला विश्वासात न घेता व कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा नाहरकत दाखला व ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव न घेता नवीन मालकांनी क्रेसर मशिनरी त्या जमिनीवरती उभे करून बेकायदेशीर गौण खनिज खदानीचे काम लोकवस्ती जवळ सुरू केल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे तेथील लोकांना नाहक त्रास होत आहे. त्याठिकाणी बेकायदेशीर गौण खनिज खदान सुरू असून जवळजवळ १ हेक्टर २० गुंठे मध्ये बेकायदेशीर खदानीचे उत्खन्न करून १०० फुट खोल खोदकाम केलेले आहे.
माकपाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कायद्याप्रमाणे ४० फुट गौण खनिज खदानीची तरतुद असुन सदर ठिकाणी खोदकाम केलेले आहे ते चुकिचे असुन त्यामध्ये गाय, बैल, शेळी पडून जखमी झाल्याची घटना अनेकदा घडल्या आहेत. तसेच गौण खनिज खदानित स्पॉट केल्याने उंच उडून घरावरती दगड पडत आहेत. याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रांत कार्यालय डहाणू यांच्याकडे तक्रार पत्र देऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. उलट नवीन मालकाकडून गावातील ग्रामस्थांना रस्त्याला जात असताना त्यांना शिवीगाळ करण्याचे काम सुरू केले आहे. व तसेच ग्रामस्थांवरती चोरीच्या खोट्या केसेस करण्याच्या धमक्या देत असून सदर व्यक्ती हे गुंडप्रवृत्तीचे असुन यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशी लेखी तक्रार माकपाने तलासरी पोलिसांकडे केली असून आदिवासीच्या कब्जात असलेल्या जमिनीवर बेकायदेशीर गौण खनिज खदान क्रॅसर खडी मशिनरी सात दिवसात बंद करण्यात यावी तसे न केल्यास सात दिवसा नंतर याच जमिनीवरती बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देत तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.