ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिवा, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, कळवा, लोकमान्य सावरकरनगर, उथळसर या परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या नळजोडण्या खंडित, बोअरवेल बंद व पंप जप्त करण्याची कारवाई आज करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या सहा प्रभागसमितीअंतर्गत पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत अनधिकृत बांधकामांच्या एकूण 28 नळ संयोजन खंडित करण्यात आले तर 19 बोअरवेल बंद करण्यात आल्या तर 02 पंप जप्त करण्यात आल्या आहे. या सर्व नळजोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच, बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास तेही तातडीने खंडीत करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत.
त्या अनुषंगाने आज अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोअरवेलही बंद करण्यात आल्याचे तर 61 इमारतींची पाहणी करण्यात आले असल्याचे विनोद पवार यांनी सांगितले.
दिवा- नळसंयोजन खंडित - 3, बोअरवेल बंद - 19, पंप जप्त - 02
माजिवडा मानपाडा-नळसंयोजन खंडित - 3
वर्तकनगर-नळसंयोजन खंडित - 11
कळवा -नळसंयोजन खंडित - 07
लोकमान्य सावरकरनगर - नळसंयोजन खंडित 3
उथळसर-नळसंयोजन खंडित - 1