The Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Knowledge Centre in kalyan Pudhari News Network
ठाणे

ठाणे : होलोग्राफीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास उलगडणार; आज लोकार्पण

कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्याधुनिक ज्ञान केंद्र होणार खुले

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण येत्या रविवारी 13 एप्रिल रोजी होणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील ज्ञान केंद्रात शेकडो पुस्तके असलेले ग्रंथालय, चित्र, दृकश्राव्य (डिजिल) रूपाने मांडण्यात आलेला डॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे. हे देशातील एकमेव असे अत्याधुनिक ज्ञान केंद्र ठरणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व भागात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी स्थानिकांची मागणी होती. त्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते. यासाठी जागा आवश्यक होती. ‘ड’ प्रभाग समितीच्या परिसरात जागा होती. मात्र त्यावर प्रभाग समितीचे आरक्षण होते. त्यामुळे हे आरक्षण बदलण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर 3 नोव्हेंबर 2021 रोजी ‘ड’ प्रभाग समिती कार्यालयाच्या जागेवरील 1300 चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक 423 हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बदलण्यात आले. विशेष म्हणजे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने विक्रमी वेळेत आरक्षण बदलाचा निर्णय झाला होता. त्यापूर्वीच यासाठी 5 कोटींचा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता. या निर्णयानंतर 8 कोटी 74 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 12 एप्रिल 2022 रोजी तत्कालिन नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन पार पडले. त्यानंतर या स्मारकाच्या कामाचे काम सुरू झाले.

रविवारी 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या आवारातील स्मारकात हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

13 एप्रिल रोजी पुतळ्याचे लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आणि ज्ञान केंद्र, ज्यात भव्य ग्रंथालय, होलोग्राफीच्या माध्यमातून थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवाद साधत असल्याचा आधुनिक प्रयोग या स्मारकात केला जाणार होता. त्यानुसार 10 मार्च 2024 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. दुसर्‍या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र, भव्य ग्रंथालय आणि होलोग्राफी दालनाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी याचे लोकार्पण संपन्न होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT