शिवसेना जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेली सर्व पक्षीय धुळवड खेळण्याची परंपरा आजही कायम आहे. किती ही राजकीय कटुता निर्माण झाली तरी सर्व पक्षीय मंत्री, माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी हे एकमेकांना रंग लावून रंगाची, आनंदाची आणि प्रेमाची उधळण करीत असतात. ही परंपरा आजही ठाण्यात बघायला मिळणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रंगापासून विरोधी पक्षातील नेते दूर राहणे पसंत करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमातील रंगपंचमी ही अनोखी रंगपचमी असते. दिवंगत आनंद दिघे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांनी सुरू केलेली धुळवड नेहमीच राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेली आहे. या दोन्ही नेत्यांच्या पश्चात ही परंपरा कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय धुळवडची परंपरा कायम सुरू ठेवून ठाणेकरांना एकत्रित येण्याची आणि आपल्या आवडत्या नेत्यांना रंग लावण्याची इच्छा पूर्ण करता येते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राजन विचारे , जिल्हा प्रमुख केदार दिघे, अविनाश जाधव, विक्रांत चव्हाण, आनंद परांजपे यांच्यासह सर्व पक्षीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार तसेच विविध क्षेत्रातील मंडळी हे रंगांची उधळण करीत ठाण्याची ही परंपरा जपत आले आहेत.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर या धुळवडीतील सर्वपक्षीय रंग फिके पडू लागले आहेत
यंदा तरी या धुळवडीत सर्व पक्षीय नेते सहभागी होऊन प्रेमाचे रंग उधळणार की नाराजीचे सावट कायम ठेवून परंपरेला छेद देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.