illegal hoardings Thane pudhari photo
ठाणे

illegal hoardings Thane : ठाण्यात मोठ्या होर्डिंग्स कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन

अनेक होर्डिंग्ज परवानगीपेक्षा मोठ्या साईजचे, ९०० पेक्षा अधिक होर्डिंग्ज बेकायदा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : प्यारी माया होर्डिंग्स कंपन्यांकडूनच नियमांचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा जास्त साईजचे होर्डिंग्स उभारण्यात आल्याची गंभीर बाब ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उघडकीस आणली आहे.

ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून केवळ ६०५ होर्डिंग्सला अधिकृत परवानगी देण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात मात्र ठाण्यात १५०० पेक्षा जास्त होर्डिंग्स उभारण्यात आले आहेत. तर ज्यांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे त्याच मोठ्या कंपन्यांनी प्रमाणापेक्षा जास्त साईजचे होर्डिंग्स उभारले असून यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करून जी होर्डिंग्स उभारण्यात आली आहे ती तत्काळ हटवण्यात यावी अन्यथा, पालिका मुख्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी ठाणे महापालिकेला दिला आहे.

ठाण्यातील होर्डिंग्सच्या संदर्भात नगरसेविका मार्जिया पठाण यांनी महासभेत प्रश्न विचारले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यातील होर्डिंग्सच्या संदर्भात गंभीर बाब समोर आणली आहे. होर्डिंग्स संदर्भात असलेल्या २०२२ च्या जी आर नुसार तसेच वाहतूक विभागाच्या नियमानुसार होर्डिंग्सची साईज आणि होर्डिंग्स कसे असा याचे नियम आहेत. मात्र या नियमांची मोठ्या होर्डिंग्स कंपन्यांकडून सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले असल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी उघड केली आहे.

नियमानुसार होर्डिंग्जच्या आकारासाठी ३० बाय ३० अशी मर्यादा आहे. मात्र शहरातील अनेक होर्डिंग्ज या निकषापेक्षा मोठ्या आकाराच्या असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने प्रत्येक होर्डिंग्जची लांबी, रुंदी, उंची आणि प्रत्यक्ष परवानगी यांची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. वाहतूक विभागाच्या नियमांनुसार होर्डिंग्ज आकर्षक असले तरी भडक स्वरूपाचे नसावेत, अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये आणि वाहतुकीस धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मात्र प्रत्यक्षात या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नियमांचे उल्लंघन करणारी सर्व होर्डिंग्ज तातडीने हटवावीत व शहरातील होर्डिंग्जचे सर्वकष ऑडिट करावे, अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने कारवाई केली नाही तर पालिका मुख्यालयाबाहेर आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला. 'अशोक वैती महापालिका मुख्यालयात जाऊन बसू शकतात, तर मीदेखील नागरिकांच्या प्रश्नासाठी मुख्यालयात जाऊन बसेन,' असे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यातील बेकायदा होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

डीपी रस्ते, फुटपाथवरही होर्डिंग्ज नाला, डीपी रस्ते, फुटपाथ, खासगी सोसायट्यांच्या जागा तसेच महापालिकेच्या वास्तूंमध्येही होर्डिंग्ज उभारल्याचा आरोप केला आहे. मोकळ्या जागेत होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी देताना त्या जागेचा वापर बाधित होत नाही ना, याची तपासणी करणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. खासगी सोसायट्यांच्या जागेत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ९ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार संबंधित प्रक्रिया होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नियमांचे पालन होत नसल्याचा दावा त्यांनी केला.

पालिका वास्तूतही नियमबाहा फलक ?

ठाणे महापालिकेच्या वास्तूंमध्येही होर्डिंग्जना परवानगी देण्यात आल्याचा आरोप करत चव्हाण यांनी प्रशासनाला सवाल केला आहे. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या ठिकाणी एका होर्डिंग्जला परवानगी असताना प्रत्यक्षात तीन होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेच्या मालकीच्या वास्तूंमध्ये परवानगीपेक्षा जास्त होर्डिंग्ज उभारण्यात आली असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. स्मशानभूमीच्या परिसरातही होर्डिंग्जना परवानगी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

१९ कोटींसाठी जीव धोक्यात ?

महापालिकेला मिळणाऱ्या जाहिरात महसुलासाठी नागरिकांच्या जीविताशी तडजोड केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. होर्डिंग्जमधून सुमारे १९ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेला धोक्यात घालत असल्याचे त्यांनी म्हटले. भविष्यात विमानांना धडकतील अशा पद्धतीने होर्डिंग्ज उभारण्याची वेळ येऊ नये, असा टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT