Thane heavy rain pudhari photo
ठाणे

Thane heavy rain : मुसळधार पावसाचा तडाखा

ठाणे जिल्हा जलमय; कल्याण-डोंबिवलीत पूरसदृश स्थिती, उद्योग ठप्प, माळशेज घाटात दरड

पुढारी वृत्तसेवा

ठाणे/भिवंडी/कल्याण/डोंबिवली : मुंबई हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने शनिवारी ठाणे जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. माळशेज घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर कल्याण-डोंबिवली, डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर आणि भिवंडी परिसरात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते जलमय झाले, कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उत्पादन ठप्प झाले, तर नालेसफाई, जलनिस्सारण आणि प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठाणे जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसादरम्यान, मुंब्रा-शीळ-पनवेल रस्त्यांवर पाणी साठले होते. कंबरेभर साठलेल्या पाण्यात अनेक वाहने बुडाली होती आणि हा रस्ता वाहतूकीसाठी ठप्प झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले होते. शनिवारी सकाळी हेच चित्र पुन्हा येथे दिसून आले. शनिवार सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साठले असून मुंब्रा-शीळ रोडवरील कौसा ते शीळ दरम्यान पाणी साठले आहे. गुडघाभर पाण्यातून अवजड वाहनचालक वाट काढताना दिसत आहेत.

कल्याण पश्चिमेतील वाडेघर चौक गुडघाभर पाण्याखाली गेल्याने आधारवाडीकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. वाडेघर तलावावरील कथित अनधिकृत भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडल्याचा आरोप करण्यात आला असून स्थानिक नगरसेविका शालिनी वाहिले यांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षद गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले. वंदेमातरम् उद्यान, सर्व्हिस रोड, एम्स हॉस्पीटल रस्ता, चार बिल्डिंग परिसर इत्यादी ठिकाणी पाणी भरले होते.

डोंबिवलीच्या मिलापनगरमध्ये नाला तुडुंब भरून वाहत असल्याने सांडपाणी थेट रहिवासी भागात येऊ लागले आहे. अरुण जोशी आणि राजू नलावडे यांनी नालेसफाई न झाल्याने रोगराईचा धोका वाढल्याचा इशारा देत केडीएमसी आणि एमआयडीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रशासनाची पावसाळी पूर्वतयारी, नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून नागरिकांनी तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची जोरदार मागणी केली आहे. डोंबिवली एमआयडीसीतही पावसाचा मोठा फटका बसला. फेज-२ मधील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले, तर काही कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उत्पादन बंद पडून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा उद्योजकांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT