ठाणे

ठाणे: मुरबाड तालुक्याला अवकाळीचा तडाखा; भात पिकाचे नुकसान

अविनाश सुतार


मुरबाड: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात व आदिवासी पट्ट्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान विजेच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल दोन तास पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे कापून खळ्यावर उडवी रचून ठेवलेले भात पिकाचे मोठे नुकसान झाले. तर उभी पिकेही पावसामुळे भुईसपाट झाली. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मुरबाड तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. तर कापून ठेवलेले भाताचे पिके पाण्यात कुजू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतात भाताची करपा टाकलेल्या भातावर पाणीच पाणी दिसून येत आहे. पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना पिके झाकण्यासाठी उसंत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी भातकापणीची लगबग सुरू आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली हळवी भातशेती कापून खळयावर उडवी रचली होती. त्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. तर हाततोंडाला आलेली पिके अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT