ठाणे

Thane | मुंबईत नोकरी मिळेल, पैसे मिळतील सांगून तिला एकटीला सोडून तो पळून गेला

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : हरियाणा राज्यातील गावात राहणार्‍या महिलेला एका इसमाने मुंबईत नोकरी लावण्यासाठी आणले. या महिलेला मुंबईत कुठेही नोकरी मिळाली नाही. अखेर तिला कल्याण रेल्वे स्थानकात आणले. गावी जाऊ असे सांगून हा इसम महिलेची नजर चुकवून स्वतः मात्र तिला एकटीला संकटात सोडून पळून गेला. कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रँचच्या गस्ती पथकाला ही माहिती मिळताच पोलिसांनी संकटात सापडलेल्या या महिलेला ताब्यात घेतले. सुरक्षितरित्या गावी जाण्याच्या कार्यवाहीसाठी या महिलेला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या मदतीमुळे या महिलेला मूळ गावी जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

  • मुंबईभर फिरूनही नोकरी नाही मिळाली

  • गावाहून आणलेल्या महिलेला संकटात सोडून पळाला

  • कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचसह पोलिसांकडून मदतीचा हात

बुधवारी (दि.२४) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फलाट क्रमांक चार ते पाच दरम्यान गस्त घालत असताना महिला पोलिस सी. एस. इंगवले, पी. एस. सातव, के. पी. कोरडे यांना पत्रीपुलाच्या दिशेकडे एक महिला एकटीच बसून रडत असल्याची दिसली. गस्तीवरील महिला पोलिसांनी या महिलेला विश्वासात घेऊन तू का रडतेस म्हणून विचारणा केली. हरियाणा राज्यातील कैथल गावची रहिवासी असल्याचे तिने सांगितले. आई-वडिलांचे निधन झाले आहे. या महिलेला कुणीही वारस नाही. गावी कामधंदा नसल्याने त्याच गावातील एका इसमाने तिला मुंबईत गेल्यावर नोकरी मिळेल, पैसे मिळतील, तेथे आपण राहू, असे सांगून तिला मुंबईत नोकरीसाठी आणले होते.

अनेक दिवस फिरूनही तिला कुठेही नोकरी मिळाली नाही. तिचे खाण्या-पिण्यासह राहण्याचे हाल सुरू झाले. बुधवारी (दि.२४) रोजी त्याने कल्याण रेल्वे स्थानकात आणले. ती रेल्वे स्थानकात बसली असताना तिची नजर चुकूवन तिचा सहकारी रेल्वे स्थानकातून पळून गेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT